‘हिंदुस्थानी भाऊ’ची चिथावणी की खरोखरच विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय? शिक्षणाचा खेळ कुणी केला?

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 4:44 PM

धारावीत आज विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

'हिंदुस्थानी भाऊ'ची चिथावणी की खरोखरच विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय? शिक्षणाचा खेळ कुणी केला?
'हिंदुस्थानी भाऊ'ची चिथावणी की खरोखरच विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय?

मुंबई: धारावीत आज विद्यार्थ्यांचा (student) आक्रोश पाहायला मिळाला. ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला, आता ऑफलाईन परीक्षा कशाला? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांच्या धारावीतील निवासस्थानाबाहेर गर्दी करत जोरदार आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांचेही धाबे दणादणले. हजारोच्या संख्येने आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. त्यामुळे धारावीत एकच अफरातफर माजली. या आंदोलनामुळे राज्य सरकारही खडबडून जागे झाले आहे. हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक (vikas pathak) यांच्या आवाहनानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहता आणि हजारो संख्येने जमलेले विद्यार्थी पाहता विद्यार्थी खरोखरच हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर रस्त्यावर उतरले की विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचा घेतलेला हा आढावा.

धारावीत नेमकं काय घडलं?

धारावीत आज दुपारी 3 च्या सुमारास अचानक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अवघ्या अर्ध्या तासात हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराकडे मोर्चा वळवून जोरदार आंदोलन सुरू केलं. यात विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा मोठा समावेश होता. रस्त्यावर अचानक हजारो विद्यार्थी आल्याने या ठिकाणी चक्का जाम झाला होता. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना पांगवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना न जुमानता आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठिमार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.

‘हिंदुस्थानी भाऊ’ची चिथावणी की खरोखरच विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय?

हिंदुस्थानी भाऊची चिथावणी

धारावीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते हिंदुस्थानी भाऊच्या सांगण्यावरून इथे आल्याचं स्पष्ट केलं. हिंदुस्थांनी भाऊने आम्हाला धारावीत बोलावलं म्हणून आम्ही आलो. पण इथे आल्यानंतर पोलिसांनी आम्हाला मारहाण केली. आम्हाला ऑनलाईन परीक्षा हवी आहे. आम्ही वर्षभर ऑनलाईन शिकलो. आता ऑफलाईन परीक्षा कशी घेता? असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला.

‘हिंदुस्थानी भाऊ’ची चिथावणी की खरोखरच विद्यार्थ्यांचा उद्रेक झालाय?

हिंदुस्थानी भाऊचं म्हणणं काय?

हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक यांनी त्यांच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्या रस्त्यावर उतरल्याची कबुली दिली. ऑफलाईन परीक्षा व्हाव्यात ही आमची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षा व्हावी म्हणून गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांना मेल करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे आज लाखो मुलं माझ्या आवाहनावर रस्त्यावर उतरली आहे. उद्या या, भेटून चर्चा करू असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. पण हेच जर आधी सांगितलं असतं तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असती. आजचं आंदोलन झालं नसतं, असं विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थांनी भाऊ म्हणाले. विद्यार्थी आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई लढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उद्या भेटून चर्चा करू

माझ्याकडे विद्यार्थ्यांनी किंवा हिंदुस्थांनी भाऊने कोणतीही मागणी केली नाही. त्यांनी तशी मागणी केली असेल तर दाखवून द्यावं. ते उद्या येऊन मला भेटणार आहेत. उद्या भेटून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि पुढील निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे असं आमचं मत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

निवेदन न देता आंदोलन योग्य नाही

निवेदन न देता आंदोलन करणं योग्य नाही. विद्यार्थ्यांनी निवेदन द्यायला हवं होतं. परीक्षा घ्या पण उशिरा घ्या, कमी मार्काचा घ्या असं विद्यार्थी म्हणत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी तसं मला सांगितलं आहे. तर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं म्हणणं वेगळं आहे. मात्र हिंदुस्थानी भाऊंचं माझ्यापर्यंत निवेदन आलं नाही. मला मीडियातून माहीत झालं. निवेदन आलं असतं तर त्यांना बोलावून घेतलं असतं. त्यांनी यावं. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं.

परीक्षेसाठीही हायब्रिड पद्धत वापरा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपाध्यक्ष प्रा. संतोष गांगुर्डे यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिक्षण क्षेत्रासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये गोंधळ नसतो. कोविडची परिस्थितीला सामोरे जाण्यास सरकार सक्षम नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे बऱ्याचवेळा विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे काही निर्णय घेतले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश दिसत आहेत, असं प्रा. संतोष गांगुर्डे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना जे सोयीस्कर पडेल त्यानुषंगाने निर्णय घेतला पाहिजे. ज्यांना ऑफलाईन परीक्षा सोयीस्कर आहे, त्यांना ऑफलाईन परीक्षेची संधी द्या. जे विद्यार्थी येऊ शकत नाहीत. त्यांना ऑनलाईनची सुविधा द्या. तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन शिकवण्याची पद्धत सुरू केली आहे. तुम्ही हायब्रिड पद्धत सुरू केलीय तर परीक्षेसाठीही तिच पद्धत वापरा, असं मतही संतोष गांगुर्डे यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या:

कोण आहे हिंदुस्थानी भाऊ, ज्याच्या आवाहनावर मुंबईत शेकडो विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकारला घामटा फोडला?

मुंबईत शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळ, शेकडो विद्यार्थ्यांचा गायकवाडांच्या घराला घेराव, सरकारला घामटा

Students Agitation : जे भल्या भल्या नेत्यांना, अभिनेत्यांना जमत नाही ते हिंदुस्थानी भाऊने कसे करुन दाखवलं? कसे जमा केले विद्यार्थी?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI