Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात वि. सुजय विखेंमध्ये महामुकाबला?
सुजय विखे पाटलांनी लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान संगमनेरमध्ये झालेल्या मेळाव्यातून सुजय विखे पाटलांनी आपल्या उमेदवारीचे संकेत देखील दिलेयत. पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. संगमनेरमधून सुजय विखे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावं असा ठराव देखील भाजप पदाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आलाय. तसंच सुजय विखे पाटलांनी देखील संगमनेरमधून आपल्या उमेदवारीचे संकेत दिलेयत.
दोन दिवसांपूर्वी सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्ती केली होती. मात्र, संगमनेरमध्ये आज झालेल्या मेळाव्यानंतर सुजय विखे पाटलांची याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं दिसतंय. याचं कारण आहे सुजय विखे पाटलांनी मेळाव्यात मतदारांना दिलेला शब्द. या मेळाव्यात फक्त सुजय विखे पाटील नव्हे तर राधाकृष्ण पाटलांनी देखील मतदारांना आव्हान करत सुजय विखे पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिलेयत. उमेदवार कोणताही दिला तरी विजय महायुतीचा होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाल. तसंच बाळासाहेब थोरातांवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांची नक्कल केली. सुजय विखे पाटलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी विखे-पाटलांवर टीका केलीय. लाडक्या मुलाचा छंद पुरावला जात असल्याचा टोला थोरातांनी लगावला. तर थोरातांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
पाहा व्हिडाीओ:-
मागील अनेक वर्षांपासून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात निवडून येताय. दरम्यान या मतदारसंघात त्यांची ताकद देखील मोठी आहे. गेल्या चार दशकांपासून थोरात आणि संगमनेरचं नातं टीकून आहे. 1985च्या निवडणुकीत थोरातांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते काँग्रेसमधून आजपर्यंत संगमनेरमधून निवडून येताय. साखर कारखाना, दूध संघ यासह बऱ्याच सहकारी संस्था, नगरपालिका थोरातांच्या ताब्यात आहे. या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झालं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क मतदारसंघात तयार झाला.
दरम्यान बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरातांचं महिलांचं आरोग्य आणि रोजगारावर मतदारसंघात काम सुरु आहे. 2019 संगमनेर विधानसभेतून बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिवसेनेच्या साहेबराव नवलेंचं आव्हान होतं. या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना 1 लाख 25 हजार 380 मतं पडली होती. तर शिवसेनेच्या साहेबराव नवलेंना 63 हजार 128 मतं पडली होती. जवळपास 62 हजार 252 मतांनी बाळासाहेब थोरात यांचा विजय झाला होता.
2019मध्येही राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, मागील 4 दशकांपासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून अपराजीत आहेत. त्यामुळे यंदा सुजय विखे-पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरलेत तर संगमनेर विधानसभेत थोरात विरुद्ध विखे पाटील असा महामुकाबला पाहायला मिळेल.
