
Uddhav Thackeray on BJP: उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला. त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना सावधगिरीची इशारा दिला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची आणि भाजप यामध्ये पक्ष प्रवेशावरून जुंपल्याचे दिसून आले. त्यात शिंदे सेना आणि भाजपमधील पक्ष प्रवेशा वादाचे ठरले. त्यावरून दोन्हीकडील बाजूने थेट युती तुटण्यापर्यंतची भाषा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कार्यकर्त्यांची ही पळवापळवी दोघांच्याही जिव्हारी लागल्याचे दिसले. त्यावर नेमकं बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली.
ॲनाकोंडा त्यांना गिळणार
मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील पक्ष चालवतात या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. हे तीनही पक्ष एकच असल्याचे ते म्हणाले. या पक्षांची नावं आणि निशाण्या वेगळ्या जरी असल्या तरी इतर दोन पक्षं हे भाजपच्या बी टीम असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला. त्यांचा मालिक एक आहे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला. महायुतीमध्ये प्रवेशावरून नाराजी नाट्य सुरु असल्याबाबत ठाकरे यांनी सूचक इशारा दिला.
यापूर्वी मी ॲनाकोंडा हा शब्द वापरला होता. त्याचा अनुभव महायुतीमधील त्यांच्या मित्र पक्षांना यायला लागल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना गिळल्याशिवाय हा ॲनाकोंडा थांबणार नाही असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. महायुती चा एकसंघपणा म्हणजे गरज सरो वैद्य मरो असे असल्याचा चिमटाही त्यांनी काढला. महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यामुद्दावर या सरकारला डिकोड करायला हवे, असे ते म्हणाले.
निवडणुकीचा अनुभव अत्यंत वाईट
निवडणुकीचा अनुभव अत्यंत वाईट आहे. निवडणुकीत गडबड घोटाळा सुरू आहे. यावेळी पहिल्या प्रथम ज्या निवडणुका अनुभवतोय, तो वाईट आहे. नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका 31 जानेवारी 2026 रोजी पूर्वी घ्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. पण त्याविषयी कोणी काहीही बोलत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये स्वतः जातीनं लक्ष घालायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भटके कुत्रे असो वा इतर बाबतीत सर्वोच्च न्यायालय लक्ष देते. ते निवडणुका आणि त्यातील घोळाविषयी सर्वोच्च न्यायालय बोललं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सत्ताधारांमध्ये जे मारामारी सुरू आहे, आधी बूथ कैप्चर व्हायचे पण आता निवडणुका कैप्चर केले जात आहे. स्वत:ची घरे भरण्याची काम सुरू आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. तर गेल्या एक वर्षांपासून मागणी करूनही विरोधी पक्ष नेते पद न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार विरोधी पक्ष नेते पद द्यायला घाबरत असल्याचे ते म्हणाले. तर इंदू मिल स्मारकाबाबत ट्रस्ट नव्हता तो गेल्या महिन्यात पुनर्गठीत केला आहे. दफ्तर दिरंगाई आहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला उशीर का होत आहे, याचे कारण काय हे सांगायला पाहिजे. भव्य आणि अति सुंदर स्मारक व्हायला हवे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.