‘या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं’, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.

शिवसेना पक्षाचा आज 58 वा वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज मुंबईच्या षण्मुखानंद सभागृह येथे कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज खोचक शब्दांत निशाणा साधला. “या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला.
“काही संस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. काही युट्युबरनेही प्रचार केला. मिंधे बोलले शहरी नक्षलवाद. हुकूमशाही तोडाफोडा आणि लोकशाही वाचवा हा प्रचार नक्षलवाद वाटतो.लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे. संविधान वाचवणं हा आतंकवाद असेलतर मी आतंकवादी आहे. पण तुमचे बापजादे दिल्लीत बसले आहेत. मोदी शहा जे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. कार्यकर्त्यांच्या घरी ईडी सीबीआयला पाठवता. अमोलला पाडणारा गद्दार निर्लज्जपणे सांगतो माझ्याकडे पर्यायच नव्हता. नाही तर तुरुंगात गेलो असतो. तुम्ही दमदाट्या देऊन तुरुंगात टाकता, दहशत निर्माण करता हा तुमचा नक्षलवाद नाही का. हा तुमचा सरकारी नक्षलवाद नाही का. हा नक्षलवादच आहे. सत्तेचा दुरुपयोग करणं हा शहरी नक्षलवादापेक्षा भयानक आहे. लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. तुम्ही खरे नक्षलवादी आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
‘तुम्हाला आव्हान देतो…’
“मिंधंयांना सांगतो भाजपला सांगतो, तुम्हाला आव्हान देतो, षंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता, धनुष्यॉबाण न लावता, शिवसेनेचं नाव न लावता लढून दाखवा. नाही तर षंढ म्हणून गावात फिरू नका. आम्ही शिवसेनाप्रमुखांखेरीज कुणाचाही फोटो वापरून वापरला नाही. कुणाचाही वापरणार नाही. मोदींचा तर वापरणारच नाही. मोदींना आव्हान आहे. विधानसभा निवडणुकीत या मी आणि तुम्ही आहे. या षंढांना बाजूला करा. वडील चोरायची नाही, धनुष्यबाण चोरायचा नाही. मिंध्याच्या वडलांचे फोटो लावा आणि या समोर . माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
