
डावे आणि उजव्या विचारसरणीचे द्वंद कायम आहे. त्यातही अनेक जण जहाल असतात. कडवे असतात. दोन्ही विचारसरणीत असे कडवे असतात. या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या मुद्यावरून त्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अचूक निशाणा साधला. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जनसुरक्षा बिलावर टीका
तेवढी दाढी राहिली तेवढं समजा. मुळात शिंदे यांनी जास्त बोलू नये. लोकं त्यांची बिनपाण्याने करतील. राहिली अर्धी तीही काढतील, अशी सुरुवातीला टीका करत त्यांनी जनसुरक्षा बिलाकडे मोर्चा वळवला. सभागृहात बोलून उपयोग नाही. काल मी निघाल्यावर विचारलं आम्हाला वाटलं तुम्ही बोलणार. म्हटलं बोलून उपयोग काय. काल जनसुरक्षा विधेयक आणलं. त्यावर चर्चा झाली. त्या चर्चेतून काही निघालं का. त्यातून काही घेणार आहात का. घेणार असाल तर मी बोलतो. सर्व काही तुम्ही पाशवी बहुमतावर रेटून नेत असाल तर बोलून काय फायदा. मी बाहेर बोलतो ते चांगलं आहे ना, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दोन्ही विचारसरणीतील चांगल्या गोष्टी घ्या
या बिलाने महिलांवरील अत्याचार थांबणार आहे का. चोऱ्या माऱ्या थांबणार आहे का. मी बिल वाचलं. त्याची सुरुवात आहे कडव्या डाव्या विचारसरणीचा. मुळात डावी विचारसरणी म्हणजे काय. उजवी काय. डावी विचारसरणी सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, समानता भाषण स्वातंत्र्य , उजव्या विचारसरणीत धर्माधिष्ठता आणि भांडवलशाही येते. म्हणजे डाव्या विचारसणीत काही चांगल्या तर उजव्या विचारसरणीत आहे. यातील चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे, असे मत ठाकरे यांनी मांडले.
सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
कडवी डावी. मग कडवी उजवी नाही का. जर का उजवी विचारसरणी ही धर्मावर आधारीत असेल. पहलगाममधील अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. म्हणजे कडव्या उजव्या विचाराचे म्हणून त्यांना सोडून देणार आहात का, असा सवाल करत त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी, देशविघटनकारी शक्तीविरोधात आपण लढत आलो आहोत. नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवण्यासाठी आमचा पाठिंबा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या आठ दहा दिवसापूर्वी भाजपने देशभर ५० वा दिवस केला. या लोकांनी आणीबाणीला विरोध केला होता. आता हीच लोकं आहेत ज्यांनी अघोषित आणीबाणी आणली आहे. ज्या गोष्टी तेव्हा त्यांनी विरोध केला तीच गोष्टी ते आणत आहे. निदान इंदिरा गांधींनी उघड केलं होतं. यांच्यात तीही हिंमत नाही. गोंधळलेले राज्यकर्ते आहेत. सत्ता मिळाली त्याचं करायचं काय हे कळत नाही. कुणासाठी मिळवली सत्ता, असा टोला त्यांनी लगावला.