पश्चिम रेल्वेचा 36 तासांचा मोठा मेगा ब्लॉक, 162 लोकल रद्द, रेल्वेच्या शेड्यूलमध्येही बदल
Mumbai Local train: मुंबईकरांना शनिवारी दुपारपासून 36 तासांचा मोठ्या मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द झाल्या आहेत. तसेच मेल, एक्स्प्रेसमध्येही बदल करण्यात आला आहे.

Mumbai Local train: पश्चिम रेल्वेने शनिवारी दुपारपासून 36 तासांचा मोठा मेगा ब्लॉक घेतला आहे. कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी शुक्रवारी (31 मे) दुपारी 1 ते रविवारी (2 जून) मध्यरात्री 1 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सुमारे 162 अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने घेतलेल्या ब्लॉक कालावधीत लोकल सेवा आणि मेल, एक्स्प्रेस जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. या बदलामुळे दोन दिवस मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
रेल्वेच्या शेड्यूलमध्येही बदल
पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान पहिल्या दिवशी 73 लोकल ट्रेन रद्द होणार आहे. दुसऱ्या दिवशी ही संख्या 89 असणार आहे. रेल्वेच्या शेड्यूलमध्येही काही बदल करण्यात आला आहे. त्यात ट्रेनचा शॉर्ट टर्मिनेशन, ओरिजिनेशन किंवा काही ट्रेन रद्दही केल्या आहेत. 30 आणि 31 मे 2025 रोजी 19418 अहमदाबाद-बोरीवली एक्स्प्रेस बोरीवली ऐवजी वसई रोडवर समाप्त होणार आहे. तसेच 19425 बोरीवली-नंदुरबार एक्स्प्रेस सुटण्याच्या स्थानकात बदल असणार आहे.
काही एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द
- अहमदाबाद-बोरिवली एक्सप्रेस (19418) आता वसई रोडपर्यंत
- बोरिवली-अहमदाबाद एक्सप्रेस (19417) वसई रोडवरून सुटणार
- बोरिवली-नंदुरबार एक्स्प्रेस (19425) आता भाईंदरहून धावणार आहे
पश्चिमी रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांनी प्रवास करणाऱ्यापूर्वी अद्यावत माहिती घ्यावी. सर्व स्टेशन मास्टर कार्यालयात यासंदर्भात माहिती उपलब्ध आहे. पश्चिम रेल्वेने मेगा ब्लॉकसंदर्भात प्रवाशांना सल्ला देताना म्हटले आहे की, लोकल सेवा रद्द करण्याची माहिती स्टेशन मास्टर कार्यालयात आहे. मेगा ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी शेड्यूल पाहूनच प्रवास करावा.
