
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर धारदार टीका केली. शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिनानिमित्त आज पनवेलमध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात राज ठाकरे यांनी झंझावती भाषण केले. लाल बावटा आणि भगवा एकत्र आले असे सांगतानाच त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सूर आळवला. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
मुख्यमंत्र्यांवर पुन्हा निशाणा
यावेळी राज ठाकरे यांनी हिंदीच्या मुद्यावरून पुन्हा भात्त्यातील बाण ओढला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यकर्त्यांचं लक्ष नसेल तर तो प्रदेश बरबाद व्हायला वेळ लागत नाही. सध्याचे राज्यकर्ते माहितच आहे, असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राज्यात हिंदी कशी लहान मुलांना कसे शिकवता येईल याचा विचार करत आहेत. पण महाराष्ट्रात जे कामधंद्यासाठी येतात त्यांना मराठी कसे येईल याचा विचार त्यांच्या मनात शिवत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
तर मग आम्ही संकुचित
यावेळी त्यांनी इतर राज्यांचे चपखल उदाहरण देत तिथे हिंदीची काय स्थिती आहे, यावर भाष्य केले. माझ्याकडे भुसे आले होते. हिंदीच्या प्रश्नावर बोलायला. मी म्हटलं गुजरातमध्ये आहे का हो. पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघेही गुजरातचे आहे. अमित शाह बोलले की मी हिंदी भाषिक नाही. मी गुजराती आहे. देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो की मी हिंदी भाषिक नाही, गुजराती आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक प्रकल्प गुजरातला गेले. डायमंड प्रकल्प गेला. प्रत्येक व्यक्तीला राज्याबद्दल प्रेम असतं. आम्ही बोलल्यावर संकुचित कसे होतो? मी जेव्हा म्हटलं गुजरातला आहे का हिंदी. म्हणाले, नाही. म्हटलं मग महाराष्ट्रात का आणता? यांचं राजकारण काय चाललंय हे समजून घ्या. एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली की जगाच्या पाठिवर तुम्हाला काहीच स्थान नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
भूमिपूत्राचा विचार करा
महाराष्ट्रातील मराठी माणूस आणि भूमिपूत्र याचा विचारच नाही. याचं भीषण स्वरुप कुठे असेल तर तो रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहे. व्यवहार करणारे आपलेच. कुंपनच शेत खात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या. उद्योगधंदे येत आहेत. त्यात बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.