गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण? महादेव जानकरांनी तर यादीच काढली, पहिल्या क्रमांकावर कोण?
Mahadev Jankar Statements : गोपीनाथ मुंडे यांचा पुढील राजकीय वारस कोण, यावरून सध्या बीडच नाही तर राज्यात चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनीच नाही तर मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा कुणाकडे द्यायचा, त्यांच्या राजकीय विचारांचा वारसदार कोण? याची बीडच नाही तर राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चा झाला. त्यात धनंजय मुंडे यांचे नाव घेत मंत्री छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आता तुम्ही चालवा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुढचा वारस कोण यावरून महाभारत सुरू आहे. अनेक नेत्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असल्याचे जाहीर केले. टी.पी. मुंडे यांनी तेच एकमेव विचारांचे वारस असल्याचा दावा केला. सारंगी महाजन यांनी तर पंकजा आणि धनंजय हे दोन्ही केवळ प्रापर्टीचे वारस असल्याचे आणि जनता आणि मुंडे यांचे चाहतेच खरे वारस असल्याचे म्हटले आहे. पंकजाताईंनी राज्यातील जनता हे वारस असल्याचे म्हटले. पण हा प्रश्न जेव्हा महादेव जानकरांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी नावांची जंत्रीच पुढे केली आणि वारसदारांच्या यादीत त्यांचे नाव जोडायला ते विसरले नाहीत.
मग कोण कोण वारसदार?
गोपीनाथ मुंडे यांचा एक नंबर वारसदार पंकजा मुंडे, दोन नंबर प्रीतम मुंडे आणि तीन नंबरला यशश्री आणि चार नंबरला महादेव जानकर हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार आहेत गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण या प्रश्नावर महादेव जानकर यांनी असे उत्तर दिले.
राज्यातील परिस्थिती गंभीर
महाराष्ट्रातील 33 जिल्हे फिरलो राज्याची परिस्थिती खूप गंभीर आहे. हे सरकार भांबावलेले आहे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही या सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावला आहे असा आरोप त्यांनी महायुतीवर केला. मानवतावादी व्यवस्था या देशात निर्माण झाली पाहिजे परंतु सत्ताधारी हिंदू मुस्लिम ओबीसी मराठा अशी भांडण लावत आहे असा आरोप महादेव जानकर यांनी केला.
या सरकारला वाटत आहे आम्ही सत्तेत आहे फार मोठे आहोत परंतु तसे वातावरण नाही कॉन्ट्रॅक्टर, शेतकरी महिला सगळेच या सरकारवर नाराज असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे. सध्या आम्ही जात्यात आहे तुम्ही सुपात आहात एवढेच अजितदादा आणि शिंदेंनी लक्षात ठेवावं भाजपच्या ऑपरेशन कमळ या प्रश्नावर उत्तर दिले. सध्या मी शेतकऱ्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करतोय परंतु नाही जमलं तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतंत्र लढू असे त्यांनी जाहीर केले.
