Devendra Fadnavis BDD Chawl : ‘नावाला ती चाळ होती, पण…’ मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला BDD मधला मन हेलावणारा अनुभव
Devendra Fadnavis BDD Chawl : वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आलं. अनेक पिढ्यांपासून काही चौरस फुटांच्या घरांमध्ये राहणाऱ्या बीडीडीमधल्या रहिवाशांना हक्काच 500 चौरस फुटाचं घर मिळालं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतला मन हेलावून टाकणारा अनुभव सांगितला.

“बीडीडी चाळींनी अनेक सामाजिक, राजकीय आंदोलन बघितली. स्वातंत्र्याची चळवळ बघितली. खूप मोठे वेगवेगळे विचार या बीडीडी चाळीतून तयार झाले. अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बीडीची चाळीत पहायला मिळाला. त्यांच्या नेतृत्वाला एकप्रकारे आयाम मिळताना आपण बघितलय. 100 वर्षातला बीडीडी चाळीतला इतिहास बघितला तर आता बरा भाग पाडलेला आहे. पण या चाळीच्या भिंतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
“या बीडीडी चाळीत अनेक कुटुंबांच दु:ख, आनंद दडलेला आहे. अनेकांच्या जीवनात झालेली प्रगती पहायला मिळाली. इथे तीन-चार पिढ्यांपासून राहिलेले लोक आहेत. मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी चाळींकडे पाहता येईल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “बीडीडी चाळींचा पूर्नविकास झाला पाहिजे अशी चर्चा व्हायची. आमचे गोपीनाथराव मुंडे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना हक्काची घर मिळाली पाहिजेत, म्हणून मोर्चा काढलेला. बीडीडी चाळीच्या अंगणात माझी मोठी सभा झाली. पोलिसांच्या हक्काच्या मागण्या मांडलेल्या” अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी बीडीच्या स्वअनुभवाबद्दल काय सांगितलं?
बीडीडी चाळीतील सभेनंतर काही लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, त्या अनुभवाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “बीडीडी चाळीत 30, 40, 50 वर्षांपासून राहणारे लोक कशा अवस्थेत राहतात ते पहायला मिळालं. अतिशय वाईट अवस्था होती. सिलिंग खाली पडत होतं. एक रुम होती, काहींनी पडदे लावलेले होते. म्हणायला नावाला ती चाळ होती. पण झोपडपट्टीपेक्षा वाईट स्थिती होती. या सगळ्या हालपेष्टा सहन करत ते इथे राहत होते. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने महायुतीच सरकार आलं. आतापर्यंत मागण्या करत होतो. आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली. बीडीडी चाळीच्या पूनर्विकासाचा मुद्दा ऐरणवीर घेतला” असं मुख्यमंत्री म्हणाले.
बीडीच्या पू्नर्विकासात बिल्डरला इंटरेस्ट कशामध्ये
“खरं म्हणजे अनेक अडचणी त्यात होत्या. 90 वर्षाची लिटिगेशन्स होती. साधारण अभ्यास केला की बीडीडी चाळीबद्दल बोललं जातं. पण पूनर्विकास का होत नाही?. माझ्या लक्षात आलं की, कुठलातरी बिल्डर पूनर्विकास करणार या अपेक्षेवर सोडलेला आहे. दरवेळेस नवीन बिल्डर येणार तो आराखडे तयार करणार. लोकांची समंती घेणार. लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार. त्यानंतर ते काम होणार नाही. आतापर्यंत चार-पाच आराखडे झाले. पण कुठलं काम पूर्ण होऊ शकलं नाही. कारण बिल्डरला इंटरेस्ट होता, मला किती सेलेबल मिळणार यामध्ये” असं मुख्यमंत्री म्हणाले.
