काँग्रेसला पुन्हा मुंबईत मोठं खिंडार, ‘माझ्यावर खूप अन्याय झाला’, झिशान सिद्दीकी अजित पवार गटाच्या वाटेवर

मुंबई काँग्रेसला पुन्हा मोठं खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे. कारण आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. झिशान सिद्दीकी आज अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी त्याबाबत सूचक वक्तव्य केलं.

काँग्रेसला पुन्हा मुंबईत मोठं खिंडार, माझ्यावर खूप अन्याय झाला, झिशान सिद्दीकी अजित पवार गटाच्या वाटेवर
झिशान सिद्दीकी
| Updated on: Aug 19, 2024 | 4:57 PM

काँग्रेसला मुंबईत पुन्हा मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण आमदार झिशान सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे आज मुंबईत अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेत झिशान सिद्दीकी सहभाही झाले. झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमापर्यंत बाईक रॅली काढली. तसेच ते जनसंवाद यात्रेच्या मंचावर गेले. तिथे त्यांनी भाषणदेखील केलं. यावेळी आपल्यावर खूप अन्याय झाल्याची सल झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली. झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. यानंतर झिशान सिद्दीकी यांनी तशे संकेत दिले आहेत. झिशान सिद्दीकी यांच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

झिशान सिद्दीकी काय म्हणाले?

“आता जे काम होत आहे ते या सर्वांच्या मदतीने होत आहे. पुढे खूप मोठं काम करायचं आहे. आपल्याला फक्त काम करायचं आहे. आपल्याला मान खाली घालून काम करायचं आहे. पण आपल्याला जो काम करण्यापासून रोखेल त्याला डोकं वर करुन उत्तर देणं देखील जाणतो. मला अनेक लोकं विचारत आहेत की, पुढे काय प्लॅन आहे. मी माझ्या माता, भगिणींना विचारतो, जे काम आहे ते जनतेचं आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे तर माझ्या केसाला कुणी धक्का देखील लाऊ शकत नाही”, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

“इथे खूप अन्याय झाला आहे. पण प्रत्येक वेळी आम्ही काँटे की टक्कर दिली आहे. तुम्ही माझ्याजवळ येतात तेव्हा मी तुमच्यासाठी काम करतो. मी जेव्हा वरती जातो तेव्हा मला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता बदलाची आवश्यकता आहे. आपल्याला न्याय देणं हे आमचं काम आहे. फक्त प्रेमाचं दुकान असून फायदा नाही तर मनामध्येही प्रेम असावं लागतं”, असं झिशान सिद्दीकी म्हणाले.

नाना पटोले यांचे कारवाईचे संकेत

दुसरीकडे, आमदार झिशान सिद्दीकी यांच्याव योग्य ती कारवाई केली जाईल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. येणारी निवडणूक त्यांना त्यांची जागा दाखवेल, असंदेखील नाना पटोले म्हणाले आहेत. “काँग्रेस हतबल नाही. जी लोकं अशा पद्धतीचं पाप करत आहेत त्यांनाच भीती वाटत आहे. काँग्रेस पक्षाच्या भरोशावर मोठी झालेल्या लोकांना वाटतं की आम्ही आहोत म्हणून पक्ष आहे. पण ही निवडणूक त्यांना योग्य जागा दाखवणार आहे. उद्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रभारी येणार आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.