
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात वेगवेगळी समीकरणे पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महामयुतीतील पक्षांनी युती केली आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनीही काही ठिकाणी आघाडी केली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी युती आणि आघाडीसाठी मोठ्या प्रमाणात बैठका झाल्या, मात्र तोडगा निघालेला नाही. आज आपण भाजप आणि शिवसेनेची युती कोणत्या महानगर पालिकेत झाली आणि कोणत्या महानगर पालिकेत तुटली याबाबत माहिती जाणून घेऊयात.
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली आहे. मुंबईतील 227 पैकी 90 जागांवर शिवसेना लढणार आहे, तर 137 जागांवर भाजप मैदानात उतरणार आहे. तसेच दोन्ही पक्ष आपल्या मित्र पक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबईसह ठाणे, जळगाव, नागपूर या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी युती केली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. तर काँग्रेसने वंचितसोबत युती केली आहे. या सर्व पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. आता उद्या अर्जांची छाणनी होणार आहे, तर 2 तारखेपर्यंत उमेदवारांना माघार घेता येणार आहे. 3 तारखेला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होऊन चिन्हवाटप होणार आहे. 15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे.