
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परदेशात फिरण्यासाठी गेलेले अनेक भारतीय हे विविध मध्य पूर्वेकडील विविध देशात अडकले आहेत. अशाच प्रकारे पर्यटनासाठी दुबईत गेलेल्या एका नागपूर कुटुंबाची ट्रीप दहशतीत बदलल्याचे पाहायला मिळत आहे. दुबईत अडकलेल्या नागपूरच्या विजय चिकटे यांच्या कुटुंबातील ११ सदस्यांनी तब्बल ६ दिवस मृत्यूच्या छायेत घालवले. अखेर प्रशासकीय मदतीमुळे हे कुटुंब सुखरूप नागपुरात परतले असून त्यांनी अंगावर शहारे आणणारा युद्धाचा अनुभव सांगितला आहे.
विजय चिकटे आणि त्यांचे कुटुंब २८ फेब्रुवारीला दुबईत पर्यटनाचा आनंद घेत होते. सर्व काही सुरळीत असताना अचानक त्यांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज येऊ लागले. आम्ही मॉलमध्ये असताना अचानक बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर संपूर्ण शहरात धोक्याचे सायरन वाजू लागले. यानंतर आम्हाला तातडीने हॉटेलमध्ये परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली.
बाहेर युद्धाची परिस्थिती, सतत आकाशात घोंघावणारी मिसाईल्स यामुळे आम्ही आमची ट्रीप न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर माधुरी चिकटे, मंगला कुटे, श्रृती चिकटे यांच्यासह कुटुंबातील लहानांपासून मोठे असे सर्व ११ जण एका हॉटेलमध्ये आसरा घेऊन राहत होतो. आमच्या कोणाचीही बाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती, प्रत्येक क्षणी भीती वाटत होती की पुढे काय होईल, असे चिकटे कुटुंबीय म्हणाले.
आम्ही दुबईत अडकले आहोत, याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने सूत्रे हलवली. त्यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि दूतावासाशी संपर्क साधून आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर सरकारच्या या सक्रिय पाठपुराव्यामुळेच आम्ही काल सहकुटुंब सुखरूप नागपूर विमानतळावर पोहोचू शकलो, असेही चिकटे कुटुंबियांनी म्हटले.
इतक्या दिवसांनी विमानतळावर पोहोचताच चिकटे कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. घरची माती आणि आपली माणसं पाहून आता कुठे आमचा जीव भांड्यात पडला,” अशी भावना विजय चिकटे यांनी व्यक्त केली.