देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण? नागपुरात होर्डिंगबाजी; कुणी साधला कुणावर निशाणा?

| Updated on: Jul 22, 2023 | 12:00 PM

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील अनेक लोक बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण? नागपुरात होर्डिंगबाजी; कुणी साधला कुणावर निशाणा?
devendra fadnavis birthday banner
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर | 22 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा. अजित पवार हे सध्या शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्या युतीमुळे राज्यात नवीन समीकरणे निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुतीचं बळ वाढलं आहे. या नव्या प्रयोगाला अवघा महिना सव्वा महिना होत नाही तोच दोन्ही नेत्यांचे एकाच दिवशी वाढदिवस आल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत होर्डिंग्ज लावले आहेत. या होर्डिंग्जमधून दोन्ही नेत्यांना शुभेच्छा तर देण्यात आल्याच आहेत. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.

नागपुरातील एका बॅनर्सवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर ही दोस्ती तुटायची नाय, असं लिहिलं आहे. तसेच या बॅनर्सवर दोन्ही नेत्यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधीचा फोटो या बॅनर्सवर लावण्यात आल्याने सर्वांचं लक्ष वेधून गेलं आहे. राजकारणातील ‘दादा’ अजित दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असा मजकूरही या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी लावले हे बॅनर्स लावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही फोटो छापण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

नाव ना गाव, होर्डिंग चर्चेत

नागपुरातील एक होर्डिंग्ज मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या होर्डिंग्जमधून उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला कलंक की भूषण? असा सवाल या भल्यामोठ्या होर्डिंग्जवरून लगावण्यात आला आहे. या होर्डिंग्जवर ते लावणाऱ्याचे नाव नाही, फोटो नाही. विशेष म्हणजे त्यावर देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो नाही. फक्त शेतकऱ्याचा भला मोठा फोटो आहे. त्यामुळे हे होर्डिंग्ज चांगलेच चर्चेत आलं आहे.

वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील अनेक लोक बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तसं त्यांनी जाहीरही केलं होतं. कुणीही फुल, गुच्छा आणू नये. भेटायला येऊ नये. बॅनरबाजी करू नये, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करत या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.