वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची युती टिकणार?; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून थेट चिरफाड

कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांबाबत काय निर्णय घ्यावा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण या दोन्ही जागांवर आम्ही उमेदवार देणार आहोत. आमचे उमेदवार निवडून येतील. या दोन्ही जागा आमच्या आहेत.

वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची युती टिकणार?; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून थेट चिरफाड
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 23, 2023 | 11:15 AM

नागपूर: उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आज युती होत आहे. आज दुपारी या युतीची अधिकृतपणे घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या युतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. असं असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युतीवर जोरदार टीका करत युतीची चिरफाडच केली आहे. ही युती अधिक काळ टिकणार नाही, असा दावाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

जे आपल्या 40 आमदारांना सांभाळू शकत नाही, आपलं घर सांभाळू शकत नाही. ते वंचित सोबतची युती किती दिवस सांभाळतील याची मला शंका आहे. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ नेते आहेत. त्यांची ठाकरे गटासोबत युती फार काळ टीकणार नाही. प्रकाश आंबेडकर एक दिवस कंटाळणार. कारण उद्धव ठाकरे यांचा संवाद नाही. संवाद करणं हे त्यांच्या रक्तात नाही. युती टिकवायला मनाचं मोठंपण लागतं. समर्पण लागतं. युती टिकवायचे हे गुण उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत. उद्धव ठाकरे घराच्या बाहेरच निघत नाही, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

आता लोकशाही आठवतेय

उद्धव ठाकरे यांना आता लोकशाही आठवतेय. आता ते मातोश्रीच्या बाहेर पडायला लागलेत. मोदी यांनी त्यांना लोकशाहीपर्यंत आणलंय, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा आजपासून शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख असा उल्लेख करता येईल, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

दोन्ही जागांवर लढणार

यावेळी त्यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकांवरही भाष्य केलं. कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांबाबत काय निर्णय घ्यावा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. पण या दोन्ही जागांवर आम्ही उमेदवार देणार आहोत.

आमचे उमेदवार निवडून येतील. या दोन्ही जागा आमच्या आहेत. महाविकास आघाडीने काही केलं तरी या जागा आम्ही जिंकू. मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. ते कसबा आणि पिंपरी या दोन्ही जागांबाबत निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आम्हाला प्रेरणा मिळेल

आज पराक्रम दिवस आहे. या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती कामठी शहरात साजरी होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा कर्तव्य पथावर बसवलाय. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र विधीमंडळात असणे आमच्यासाठी ऊर्जा देणारं ठरेल. त्यांचे दर्शन होईल.

हिंदूत्वाच्या भावनेतून मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळेल. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल, असं ते म्हणाले.