शिवशक्ती-भीमशक्ती हीच खरी महाशक्ती, संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात बरंच काही घडणार…

भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 10:41 AM

बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. जगात फिरण्या लायक बनवलं. आम्ही त्यांचे ऋणीच आहोत. त्यांनी शिवसेना स्थापन केली नसती, तर महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची पिढी आलीच नसती.

शिवशक्ती-भीमशक्ती हीच खरी महाशक्ती, संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात बरंच काही घडणार...
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,  मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज अधिकृतपणे घोषणा होणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात आज क्रांतिकारक घटना घडणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात युतीची घोषणा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र येणार आहेत. ही तर सुरुवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरंच काही घडणार आहे, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात. दोन शक्ती एकत्र याव्यात. कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे.

पण त्यात तथ्य नाही. ठाकरे-आंबेडकर एकत्र येईल ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबूत होईल, असं संजय राऊत म्हणले.

उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबद्दलही भाष्य केलं. उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहतील. ते आजही आहेत. उद्याही राहतील. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळेच तेच पक्षप्रमुख राहतील, असं राऊत म्हणाले.

ताठ मानेने जगायला शिकवलं

यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मराठी माणसाला राज्याच्या राजधानीत स्वाभिमानाने, ताठ मानाने जगता यावं यासाठी बाळासाहेबांनी 55 वर्ष आयुष्याची झिज सोसली. संघर्ष केला. तुरुंगवास भोगला. केंद्र आणि राज्यातील प्रबळ सत्तेशी अक्षरश: युद्ध केलं. तेव्हा कुठे मुंबई मराठी माणसाची राहिली, असं ते म्हणाले.

हृदयावर चित्रं कोरलं

लढत राहा. संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभं राहा असा मंत्र बाळासाहेबांनी दिला. आपण जे काही मराठी माणूस म्हणून जगतो ही त्यांची देणगी आहे. त्यासाठी मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहिल. स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होईल. पण सर्वांच्या हृदयावर बाळासाहेबांचं चित्रं कोरलं ते कायम राहील, असा चिमटाही त्यांनी काढला.

आम्ही त्यांचे ऋणीच आहोत

बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. जगात फिरण्या लायक बनवलं. आम्ही त्यांचे ऋणीच आहोत. त्यांनी शिवसेना स्थापन केली नसती, तर महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची पिढी आलीच नसती. त्यांनी फाटक्या तरुणांना मंत्री, आमदार, नगरसेवक, खासदार, केंद्रात मंत्री, मुख्यमंत्री केलं. कोणतंही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी हे केलं. हा चमत्कार केला. असा चमत्कार घडवणारा व्यक्ती शतकातून एखादाच होतो, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गट वगैरे काही नाही

शिवसेनेत गट वगैरे काही नाही. आम्ही तो गट मानत नाही. हा भाजपने गट तयार केला असेल, अशी टीका त्यांन ीकेली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI