Nagpur Fake Currency: वाठोड्यात फ्लॅटमध्ये नकली नोटांचे घबाड, घरमालकाने कुलूप तोडून प्रवेश करताच फुटले बिंग
Nagpur Wathoda Fake Currency: नागपूरमध्ये भाडेकरूनेच फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापल्या. घरमालकाने कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करताच हे बिंग फुटले. मालकाला याप्रकारामुळे धक्का बसला. सध्या फरार भाडेकरूचा शोध सुरू आहे.

Nagpur Wathoda Fake Currency: नागपूरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्येश्वरनगर परिसरात भाडेकरूच्या खोलीत लाखो रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घरमालकाने खोली उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळावरून नोटांचे बंडल, प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भाडे थकवले अन् भांडाफोड
पुष्पक भांडारकर उर्फ भेंडारकर उर्फ बेंडे असे संशयिताचे नाव आहे. तो चैतन्येश्वरनगर येथील रमेश हरडे यांच्या घरी भाड्याने राहत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो घरी परतला नव्हता. त्याच्याकडे काही महिन्यांचे भाडेही थकीत होते. भाड्याबाबत विचारणा केल्यावर तो शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करीत असल्याची तक्रार हरडे यांनी यापूर्वी वाठोडा पोलिसांकडे केली होती.
पुष्पक बराच काळ घरी न आल्याने हरडे यांनी त्याच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना छापील नोटांसारखे दिसणारे कागदी बंडल आणि प्रिंटर आढळले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून साहित्य जप्त केले. खोलीच्या तपासणीत ५०० रुपयांच्या ३७ लाखांच्या नोटा दोन्ही बाजूंनी, तर ४८ लाखांच्या नोटा केवळ एका बाजूने छापल्याचे आढळले. संशयित पुष्पक मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
नोटा छापल्या कुठे?
वाठोड्यातील थ्री स्टार को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर हा वनबीएचके फ्लॅट होता. तो पुष्पम भंडारकर याने भाड्याने घेतला होता. तो फ्लॅट रिकामा करत नव्हता आणि हरडे यांना धमकी देत होता. भंडारकर परत न आल्याने हराडे यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा त्यांना सोफ्यावर 500 रुपयांच्या नोटांसारखे दिसणाऱ्या नोटा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. आता भंडारकर कुठे आहे, त्याने या नोटा कुठे छापल्या. तो रॅकेटचा सदस्य आहे का? त्याचे इतर साथीदार कोण याचा तपास पोलीस करत आहेत.
