मनोज जरांगे यांची आंदोलनाची घोषणा, वडेट्टीवारांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पाळीव प्राण्यांना लाजवेल अशी…

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवत, जरांगेसमोर सरकार 'पाळीव प्राण्यांना लाजवेल अशा पद्धतीने' झुकत असल्याचा वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे.

मनोज जरांगे यांची आंदोलनाची घोषणा, वडेट्टीवारांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, पाळीव प्राण्यांना लाजवेल अशी...
vijay wadettiwar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 2:12 PM

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईत जरांगे यांचं आंदोलन होत असल्याने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेशोत्सवात गर्दी होणार आहे. मात्र सरकार हे आंदोलन कसे हाताळते हे पाहावे लागेल. ओबीसी विरुद्ध हिंदू असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करतानाच सरकारमध्ये दम नाही. सरकारचे मंत्री पाळीव प्राण्यांनाही लाज वाटेल अशा पद्धतीने मान वाकवून जरांगेंकडे जात असतात, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मनोज जरांगेंकडे जाताना सरकारचे मंत्री इतके मान वाकवत जातात, त्यांची मान कशी तुटत नाही? असे म्हणण्याची वेळ आली आहे. पाळीव प्राण्याला लाजवेल अशा पद्धतीने मंत्री मान वाकवत जातात. त्यामुळे जरांगे पाटलांना बादशहा झाल्यासारखं वाटते. सरकार झुकती है, झुकानेवाला चाहिये, हे त्यांना माहीत आहे. सरकार झुकते आहे. त्यामुळे काय करायचे हा सरकार आणि जरांगेचा विषय आहे. ते बघतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसींवर संकट आलंय

जरांगे मुंबईत आल्यावर मुंबईकरांना त्याचा त्रास होईल, याकडेही वडेट्टीवार यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गणेशोत्सव असल्याने नक्कीच गर्दी होईल. मात्र सरकारने ते आंदोलन कसे हाताळावे हे पाहावे. ओबीसी विरुद्ध हिंदू हा वाद निर्माण करण्याचं काम सरकारने केलं आहे. ओबीसीवर आलेलं हे संकट आहे. हे सरकारचं पाप आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

सरकारने गांभीर्य ठेवावं

सरकार ओबीसींच्या प्रश्नात लक्ष घालत नाही. ओबीसींचे प्रश्न सोडवत नाही. ओबीसींना नोकऱ्या देताना 80 टक्के लोकांना फक्त 15 टक्के जागा मिळत आहेत. तिच परिस्थिती नोकरीमध्ये आहे. आता जरांगे पुन्हा आंदोलन करत आहे. सरकारने हे आंदोलन कसं हाताळायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या मागण्या आम्ही पुढे ठेवलेल्या आहेत. तेव्हा सरकारने गांभीर्याचं भान ठेवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

बनवाबनवी सुरू

स्थानिक स्वराज्य संस्थेत काही शिल्लल्क राहिलेलं नाही. काही जिल्ह्यात 90% जागा मायक्रो ओबीसींच्या हातून गेल्या आहेत. मागे जिल्हा परिषदेत हे सगळं घडलं. ओबीसींच्या नावावर प्रमाणपत्र घेऊन हे लोक निवडून आले आहेत. हे जर घडत असेल तर ओबीसी सुरक्षित कुठे आहे? त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडून येता येतं नाही. प्रस्थापित लोक निवडून येत आहेत. बोगस ओबीसी निवडून येत आहेत. खोटे प्रमाणपत्र घेऊन निवडून येत आहेत. हे सरकार ओबीसीचे हित खरंच साधत आहे का? ही सगळी बनवाबनवी सुरू आहे, अशी टीका त्यांनी केलीय.

सरकारमध्ये दम असेल तर

सरकारमध्ये दम असेल तर त्यांचं आंदोलन हाणून पाडलं पाहिजे. ते ओबीसी नेत्यांवर खालच्या भाषेत, खालच्या दर्जात घाणेरडे शब्द वापरतात. त्यांच्या बुद्धीची कीव यायला लागली असे शब्द ते वापरतात. आंदोलन करण्याला विरोध नाही. पण हे सरकार शेपूट घालून बसलेले आहे. सरकारमध्ये कारवाई करायचा दम नाही. कमरेच्या खालच्या शिव्या देऊनही सरकारला लाज वाटत नाही. हे सगळं सहन करत आहे. हाच सरकारचा नाकर्तेपणा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

जरांगेंचे पाय चेपून द्या

मोठमोठ्या नेत्यांवर जरांगे बोलत असेल तर सरकारने भूमिका घेतली पाहिजे. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर सरकारमध्ये दम असेल तर कारवाई कारवाई करावी. नाहीतर सरकारने पुन्हा मंत्री पाठवावेत, आंदोलकांचे पाय चेपून द्यावेत, जरांगे पाटलाच्या पायाची मसाज करून द्या, म्हणजे ते तुमचं ऐकतील. जे काही चाललं आहे, ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us