Congress:मोठी बातमी! भाजपाविरोधात काँग्रेसची ‘मनसे’ साथ? विजय वडेट्टीवार यांचे मोठे संकेत काय?

Congress-MNS-Mahavikas Aaghadi: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला. पण आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी वेगळेच संकेत दिले आहे. भाजपला रोखण्यासाठी मनसेसोबत जुळवून घेण्याची भाषा सुरू झाली आहे.

Congress:मोठी बातमी! भाजपाविरोधात काँग्रेसची मनसे साथ? विजय वडेट्टीवार यांचे मोठे संकेत काय?
काँग्रेस, मनसे
Updated on: Nov 22, 2025 | 12:19 PM

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील स्थानिक नेतृत्वाला मनसेसोबत आघाडी नसल्याचे समोर आले होते. तर पालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचे संकेत पण देण्यात आले होते. पण काँग्रेसमध्ये मनसेसोबत जाण्यावरून दोन मत प्रवाह दिसून येत आहे. ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत जुळवून घेण्याविषयीचे संकेत दिले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पुन्हा मोठ्या घडामोडी पाहायला मिळू शकतात.

मनसेबाबत अनुकूल धोरण?

सत्याचा मोर्चा मतचोरी संदर्भात होता. लोकशाही वाचवण्यासाठी होता. शेवटी आयडिओलॉजीचा प्रश्न महत्त्वाचा असतो. शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडली आहे, भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भात सकारात्मक आहोत, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

सत्याच्या मोर्चात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा हिरारीने सहभाग घेतला. इतकेच काय, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीच या मोर्चासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अनुपस्थितीत असले तरी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे आता भाजपला महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचा सूर आळवल्याचे दिसून येत आहे.

भाजपवर सडकून टीका

भाजप मुंबई महापालिकेत दणदणीत विजय मिळवणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ते भाजपने केलेला सर्वेक्षण असून भाजपने निर्माण केलेली काल्पनिक कथा आहे, स्वतःच मीडियाकडे माहिती द्यायची. हा लोकांचा परसेप्शन बदलविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. काल मुंबईत अनेक मतदार ओळखपत्र मिळाले आहे. त्यामुळे भाजपला वाटत असावं जे बिहारमध्ये केलं ते मुंबईत करून दाखवू. त्यांना लोकशाही संपवायची आहे, म्हणून ते म्हणतात महाविकास आघाडी किंचित उरेल.इमानदारीने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या सर्व समोर येईल.अशी टीका त्यांनी केली.

दादागिरी, गुंडगिरीकरून पैसा, दबावतंत्र आणि यंत्रणेचा वापर करून भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध झाले आहे. पोलीस बळाचा वापर करून, धामकावून निवडणूक बिनविरोध होत असेल आणि हे आम्ही बिनविरोध निवडून आल्याची पाठ थोपटून घेत असेल तर असेच होणार. सत्ता तुमची, यंत्रणा तुमची, लोकशाही पायदळी तुडवा, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह

मुंबईतील स्थानिक नेत्यांनी मनसेसोबत न जाण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाला कळवला होता. मुंबईत चिंतन शिबिर झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला. तर खासदार वर्षा गायकवाड यांनी मारहाण करणाऱ्या, गुंडागर्दी करणाऱ्यांसोबत आमचा पक्ष कधीही जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याला दुजोरा दिला. पण विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत मनसेसोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्येच दोन मत प्रवाह असल्याचे दिसून येत आहे.