भाजपनंतर उद्धव सेनेचा ‘मनसे’ डाव; ‘राज’कीय डावपेचात शिंदे सेनेला दाखवणार कात्रजचा घाट? मुंबई महापालिका निवडणुकीत घडतंय काय?
Mumbai Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत. त्यातच त्यांना उद्धव सेना राजकीय डावपेचात कात्रजचा घाट दाखवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे शिंदे सेनेची सगळ्याच्या बाजूने दमकोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. मुंबई महापालिका निवडणुकीत काय घडतंय?

Uddhav Thackeray-Raj Thackeray: मित्रपक्ष भाजपकडूनच शिंदे सेना जेरीस आली आहे. तर आता मुंबई महापालिकेत शिंदे गटासमोर मोठे आव्हान उभं ठाकण्याची शक्यता आहे. उद्धव सेना या निवडणुकीत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मोठे कार्ड खेळणार आहे. ठाकरे बंधूंच्या खेळीमुळे शिंदे सेनेला या निवडणुकीत कात्रजचा घाट दाखवण्यात येणार आहे. मुंबई पालिकेत शिंदे सेनेला रोखण्यासाठी उद्धव सेनेने पत्ते पिसले आहेत. या मनसे डावामुळे शिंदे सेनेला पालिका निवडणुकीत मोठे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
उद्धव सेनेचे मास्टरकार्ड
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षफुटी नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
75 जागांवर अटीतटीचा ‘सामना’
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर मुंबईत दोन सेना कायम आमने-सामने उभ्या ठाकल्या. पण या वर्षी मे महिन्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने पारडे पालटले आहे. त्यातच महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्याचाच फायदा घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी आतापर्यत मनसे कडून 75 जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. मनसेने मागणी केलेल्या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे उद्धव सेनेचा हा मनसे डाव शिंदे सेनेच्या जिव्हारी बसण्याची शक्यता आहे.
राजकीय डावपेच; सत्तेचा ‘राज’मार्ग मोकळा?
उद्धव सेना आणि मनसेच्या या खेळीचा मोठा फटका शिंदे सेनेला बसण्याची शक्यता आहे. एक म्हणजे शिंदेच्या उमेदवारांना मनसेने रोखायचं आणि दुसरं म्हणजे भाजपला उद्धव ठाकरे गटाने रोखायचं आहे. जिथं शिंदेचे उमेदवार आहेत, तिथे उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला तर शिवसैनिकांची पसंती शिंदेंच्या उमेदवाराला असू शकते. पण शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मनसेने उमेदवार दिला तर आपसूकच शिंदेंचे शिवसैनिकही मनसेला पर्याय म्हणून मतदान देऊ शकतात. तर, ठाकरेंनी भाजपच्या विरोधात उमेदवार दिला तर मनसेचे आणि शिंदे गटाची मतेही ठाकरे गटाकडे जातील. सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये बिनसलं आहे. प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेलं आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नाराज शिवसैनिकांची मते ठाकरेंना मिळू शकतात. त्यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा राजमार्ग खुला होईल.
