Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..

Ind vs Pak : दुबईत आज भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याविरोधात विविध मतमतांतरे मांडली जात आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

Ind vs Pak : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, म्हणाले..
Nana Patekar on IND vs Pak
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 14, 2025 | 3:00 PM

Ind vs Pak : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथं पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडरी यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंतही उपस्थित होते. 2015 मध्ये नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज या फाऊंडेशनची दशकपूर्ती होत आहे. यावेळी नाना पाटेकरांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. नाम फाऊंडेशनचं कार्य आणि श्रेयवादावर बोलताना नानांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपली मत मांडलं.

काय म्हणाले नाना पाटेकर?

“मकरंद माझ्यापेक्षा गावगाड्यात खूप फेमस आहे. गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे. नाम फाऊंडेशनला दहा वर्षे पूर्ण झाली, याचा मला आनंद आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ही चळवळ सुरू झाली. हे फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून 60 लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामं ‘नाम’तर्फे झाली आहेत,” असं ते म्हणाले.

पुढे राजकारण आणि शेतकऱ्यांबद्दल मतं मांडताना ते म्हणाले, “आम्हाला श्रेय वाद नको आहे. राजकीय व्यक्ती काय म्हणतात, त्यापेक्षा आपण कामाला महत्त्वं देणं महत्वाचं आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्तीचा प्रचार करत नाही. शेतकरी बांधवांना पक्का हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना दीड पट हमीभाव मिळावा, असं माझं मत आहे.”

यावेळी नानांनी आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरही रोखठोक भूमिका मांडली आहे. भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळू नये, असं माझं व्यक्तिगत मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाम फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसुद्धा उपस्थित होते. “जो सामाजिक काम करतो, त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज पडत नाही. मी एखादा प्रोजेक्ट करताना सरकारला दूर ठेवतो. सरकारचा हात लागला की प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे मी त्यांना हात लावू देत नाही. प्रत्येक राजकारणी हा पुढच्या निवडणुकीबद्दल विचार करतो, तर प्रत्येक समाजसेवक हा पुढच्या समाजाच्या घटकाबद्दल विचार करतो. त्यामुळे आपला जॉब हा थँकलेस आहे,” असं ते म्हणाले.