दोन एकरावर पेरणी, पण सोयाबीन उगवलेच नाही, व्यथा सांगताना आजीला अश्रू अनावर, कोण करणार कारवाई बोगस बियाणे कंपन्यावर
Nanded Bogus Seed : पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांवर अगोदरच दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. त्यातच सोयाबीनचा पेरा केला असतानाच पिक उगवले नसल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यात 500 वर बोगस सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी आल्या आहेत.

यशवंत लोंढे, प्रतिनिधी/ नांदेड : जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर आता नवसंकट उभं ठाकलं आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी मान्सूनपूर्व आणि मान्सून नंतर पेरणी केली. जिल्ह्यात उडीद, मूग, कापूस, या सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आता कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत.500 वर जिल्ह्यातून ह्या तक्रारी आल्या आहेत. अर्धापूर तालुक्यातील गावातील अनेक शेतकर्यांवर बोगस बियाण्यामुळे दुबार करण्याची पेरणीची आली आहे. याबाबत व्यथा मांडताना आजीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.40 हजार रुपये खर्च करून सोयाबीनची पेरणी केली होती मात्र सोयाबीन उगवले नसल्याने आता भीक मागून खायची वेळ आली आहे असं सांगताना आजीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
कर्ज काढून बियाणे खरेदी
कर्ज काढून चिमणाबाई थोरात यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केली होती. आठ दिवसांपापूर्वी त्यांनी पेरणी केली. त्यांच्या शेजारच्या शेतात बियाणे उगवले. पण थोरात यांच्या शेतात सोयाबीन उगवले नाही. या पेरणीसाठी या आजीला 40 हजार रुपये खर्च आला होता. आता पैसा कसा फेडावा या विचाराने त्यांच्या काळजात कालवा कालव दिसली. त्यांना अश्रु अनावर झाले. आता भीक मागून जगावं का, असा सवाल त्यांनी केला. बोगस बियाणे विक्री करणार्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
दुबार पेरणीचे संकट
तर बालाजी हेंद्रे या शेतकऱ्याने सहा बॅग सोयाबीन पेरला होता. त्यातील केवळ 3 बॅग सोयाबीन उगवला. या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. कृषी विभाग आणि दुकानदारांची मिलीभगत असल्यानेच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
कायदा व्यापार्याच्या बाजूने
व्यापाऱ्याची बाजू घेणारा कायदा आहे. नुकसान भरपाई देण्याचे निश्चित नाही. कंपनी कडूनही नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी कायद्यात तरतूद नाही. गुणवत्ता नियंत्रक विभाग सरकारसाठी हप्ते गोळा करतो. नांदेड जिल्ह्यात तीन चार हजार पेक्षा जास्त शेतकर्यांच्या तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती संभाजी ब्रिगेडच्या शेतकरी आघाडीचे संतोष गव्हाणे यांनी दिली.
असे बरेच शेतकरी आहेत यांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास असल्याने त्यांनी दुबार पेरणी केली आहे. सर्वप्रथम गुणवत्ता नियंत्रण विभागावर कारवाई करावी, नुकसान भरपाई कंपनी वल्याकडून वसूल करावी. आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहोत, कंपनीच्या प्रतिनिधीला घेराव घालणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
