बंडखोरी टळली की वाढली? नांदेड विधानपरिषदेत सर्वात मोठा उलटफेर, नक्की काय घडतंय?
नांदेड विधान परिषद निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. महायुतीतील प्रवीण चिखलीकर माघार घेण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीतील तिढा सुटणार का? वाचा सविस्तर बातमी.

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. नांदेड विधान परिषद मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या नांदेडमधून ८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पण तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
महायुतीमधील बंडखोरी टळणार; चिखलीकर माघार घेणार?
माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या भाजपचे अमरनाथ राजूरकर यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मोठी बंडखोरी निर्माण झाली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला आहे. आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रवीण पाटील चिखलीकर आपल्या उमेदवारी मागे घेण्याची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीत अजूनही ‘सस्पेन्स’ आणि बंडखोरीचे आव्हान
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. मविआकडून तब्बल चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांना काँग्रेसने ‘एबी’ फॉर्म दिला आहे. तर काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे आज आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी ज्योतिबा खराटे यांनीही अर्ज दाखल केला.
काँग्रेसने सुमठाणकर यांना अधिकृत फॉर्म दिला असला, तरी शिवसेना (उबाठा) कडून कृष्णा पाटील आष्टीकर आणि ज्योतिबा खराटे यांनीही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे मविआचे नेते या दोघांची समजूत काढून त्यांचे अर्ज मागे घेण्यात यशस्वी होतात का, यावर मविआची रणनीती अवलंबून असेल.
आज दुपारी ३ नंतर चित्र स्पष्ट होणार
तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशांत इंगोले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोरांनी आणि इतर अपक्षांनी माघार घेतल्यास, ही निवडणूक अमरनाथ राजूरकर (महायुती) विरुद्ध रामदास पाटील सुमठाणकर (महाविकास आघाडी) अशी थेट होणार की तिरंगी/चौरंगी होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. येत्या १८ जूनला या जागेसाठी मतदान पार पडणार आहे.