सरणावर बापाचा देह जळत होता अन्… ती परीक्षा द्यायला निघाली, कुठून आणली श्रृतीने एवढी हिंमत? का होतेय तिची चर्चा?
कुटुंबावर ओढवलेलं संकट, तिचं दुःख बाजूला सारत श्रुतीने अंत्यविधीची तयारी केली अन् लगेच पेपर देण्यासाठी तयार झाली. श्रुतीने एवढ्या कमी वयात दाखवलेली ही हिंमत पाहून सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय.

राजीव गिरी, नांदेड : ऐन परीक्षेच्या काही दिवस आधी तिच्या बाबांना फिट्सचा त्रास झाला. ते चक्कर येऊन पडले अन् कोमात गेले. आठ दिवस मृत्यूशी झुंज. अखेर अपयशी. त्यांनी तिच्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती, ती शिकून सवरून नर्स व्हावी, असं वाटत होतं. तिचा बारावीचा पहिला पेपर अन् बाबांची प्राणज्योत मालवली. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हतबल झालेली आई, बाबांचं छत्र हरपल्याने गोंधळलेली लहान भावंडं सोडून तिला निघावं लागलं. इकडे घरातल्या मोठ्यांनी बाबांचा देह सरणावर ठेवला अन् तिने त्यांना शेवटचा नमस्कार केला. तिच्याकडे उरला फक्त बाबांचा फोटो अन् त्यांच्या असंख्य आठवणी. हा शिधा घेऊनच ती परीक्षेला पोहोचली. अशा नाजूक प्रसंगी हिंमत एकवटून बारावीचा पेपर द्यायला गेलेल्या श्रुतीचं सध्या गावात कौतुक होतंय. एवढ्या लहान वयात कुठून आली असेल तिच्यात एवढी हिंमत?
श्रुतीच्या हिंमतीची चर्चा
श्रुतीने दाखवलेल्या धैर्याची सध्या नांदेडमध्ये चर्चा आहे. श्रुती ही नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील करमोडी गावात राहणारी विद्यार्थिनी. तिचे वडील सीताराम आणेराव यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. वडिलांची प्राणज्योत मालवली, त्याच दिवशी श्रुतीचा बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. पण कुटुंबावर ओढवलेलं संकट, तिचं दुःख बाजूला सारत श्रुतीने अंत्यविधीची तयारी केली अन् लगेच पेपर देण्यासाठी तयार झाली. श्रुतीने एवढ्या कमी वयात दाखवलेली ही हिंमत पाहून सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय.
१०-१२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज
करमोडी गावात ल्पभूधारक शेतकरी सीताराम आणेराव यांचे वय ४८ वर्षे होते. २० फेब्रुवारी रोजी रात्री त्यांचं निधन झालं. त्यांना अनेक दिवसापासून फिट्सचा त्रास होता. १० फेब्रुवारी रोजी रात्री झोपेतून उठून बाथरूमकडे जाताना चक्कर येऊन डोक्यावर पडले. यानंतर त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. परंतु यश आले नाही. सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ, आई असा परिवार. व्यवहारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचगव्हाण येथे बाराव्या वर्गात श्रुती शिक्षण घेत आहे. श्रुतीला एकीकडे परीक्षा अन् दुसरीकडे वडिलांचा अंत्यविधी अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. तिच्या परीक्षेमुळे नातेवाईकांनी अंत्यविधी लवकर उरकून घेतला. ती मनाठा येथे परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळेत हजर झाली. दुःख सावरत तिने परीक्षा दिली. श्रुतीचा लहान भाऊ आठव्या वर्गात आहे. तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
