आदिवासी संघटनांच्या मूक मोर्चाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड, दगडफेकीमुळे नंदूरबारमध्ये तणाव!
नंदूरबारमध्ये जमलेल्या हजारो आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलकांडून करण्यात येत होती.

Nandurbar Porotest News : नंदूरबारमध्ये एका हाणामारीत आदिवासी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आता नंदूरबार जिल्ह्यात वातावरण तापले आहे. या हाणामारीत सहभागी असलेल्यावर तसेच तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे. याच मागणीसाठी अनेक आदिवासी संघटना तसेच हजारो आदिवासी बांधव आक्रमक झाले असून नंदूरबार शहर बंद ठेवण्यात आले आहे. आदिवासी बांधव आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असून आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली असून आता नंदूरबारमध्ये तणावाची स्थिती आहे.
वाहनांची तोडफोड, आंदोलनाला हिंसक वळण
मिळालेल्या माहितीनुसार मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यासाठी हजारो आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमा झाले आहेत. या वेळी आंदोलकांच्या हातात अनेक फलके होती. याच आंदोलनाला आचानक हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड केली. काही प्रमाणात गडफेक झाल्याचीही घटना घडली. या घटनेनंतर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. यामुळे काही काळासाठी नंदूरबार जिल्हाधिकारी परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
आंदोलनात पोलीसही जखमी, रुग्णालयात उपचारासाठी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली आहे. सोबतच आंदोलनलाा हिंसक वळण लागल्यामुळे काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या आंदोलनात वीस ते बावीस हजार आंदोलक सामील झाले होते. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनासोबतच काही आंदोलकांनादेखील इजा झाली आहे.
प्रशासन काय निर्णय घेणार?
दरम्यान, आता पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यामुळे हे प्रकरण जास्तच तापण्याची शक्यता आहे. आदिवासी संघटना नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच आंदोलकांची दखल घेऊन प्रशासन आदिवासी तरुणाच्या मृत्यूची चौकशी करणार का? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
