नरेंद्र महाराजांची सर्वात मोठी मागणी, म्हणाले, मुस्लिमांची संख्या वाढतेय, आता…
नरेंद्र महाराजांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. हिंदूंनी किमान दोन मुले जन्माला घालून आपली संख्या वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. देशात हिंदू राष्ट्र हवे आणि हिंदू व्होट बँक मजबूत करावी, असेही ते म्हणाले. धर्मांतराविरोधात काम करत असल्याचे सांगून त्यांनी भाजप सरकारच्या हिंदुत्ववादी धोरणांचे समर्थन केले.

नाणीजधामचे जगतगुरू नरेंद्र महाराज यांनी एक मोठी मागणी केली आहे. नरेंद्र महाराज यांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. मुस्लिमांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता हिंदूंनीही लोकसंख्या वाढवली पाहिजे. हिंदूंनी किमान दोन मुले तरी ठेवावीत, असं आवाहनच नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. नरेंद्र महाराज यांच्या या आवाहनामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुहागरच्या शृंगारतळी येथील एका प्रवचनावेळी त्यांनी हे आवाहन केलं.
देशात हिंदूंची संख्या कमी होत चालली आहे. मुस्लिमांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हिंदूंनी लोकसंख्या वाढीवर भर दिला पाहिजे. हिंदूंनी किमान दोन मुले जन्माला घालावी. प्रत्येकाला किमान दोन मुले असावीत, असं आवाहनच नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. सध्याच्या वोट बँक राजकारणामुळे हिंदूंची संख्या आणि संघटना कमकुवत होत असल्याचा दावाही त्यांनी केला. हिंदूंनी देव-देश-धर्म यामागे संघटित व्हावे, असं आवाहनही त्यांनी केलं.
हिंदू राष्ट्र का नको?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राची गरज नसल्याचं म्हटलं होतं. पण नरेंद्र महाराज यांनी या उलट मागणी केली आहे. जगात अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत. ख्रिश्चन राष्ट्र आहेत. मग हिंदू राष्ट्र का नाही? असा सवाल करतानाच भारतात हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंचं भविष्य धोक्यात आहे, असा दावा नरेंद्र महाराज यांनी केला आहे.
हिंदू व्होट बँक वाढवा
यावेळी त्यांनी भाजपलाही सल्ला दिला. भाजपने हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे. भाजपने सर्वसाधारण संतांसोबत स्वतंत्र उपक्रम राबवले पाहिजे, असं सांगतानाच हिंदू संस्कृती मजबूत करण्यासाठी हिंदू व्होट बँक वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रेशर असल्याशिवाय राजकारणी जागेवर येत नाही, असा दावाही त्यांनी केला.
दीड लाख लोकांना हिंदू धर्मात घेतलं
यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या काळात हिंदू सणांवर टीका व्हायची. आता भाजपच्या काळात हिंदू धर्म संवर्धन होत आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच धर्मांतरावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही 1 लाख 53 हजार लोकांना हिंदू धर्मात घेतलं, असं सांगतानाच परिस्थितीचा फायदा घेऊन धर्मांतर करणाऱ्यांचा ‘छुपा अजेंडा’ हाणून पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मोदींमुळे तिसरं महायुद्ध रोखलं
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचीही वाखाणणी केली. मोदींनी तिसरं महायुद्ध रोखलं. भारतीय संस्काराचा हा परिणाम आहे. जगाला शांतता हवी असेल तर मन मोठं करावं लागेल, सर्वांना सुखाने जगण्याचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सर्व आचार्यांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
