नाशिकः एक जुनी कविताय. कवयित्री विमल लिमये यांची. त्या कवितेचा समारोप अतिशय नितांत सुंदर आणि गोड अशा ओळींनी केलाय. त्या म्हणतात…
या घरट्यातून पिल्लू उडावे,
दिव्य घेऊनी शक्ती
आकांक्षांचे पंख असावे,
उंबरठ्यावर भक्ती
असे घर कुठे असेल की नाही माहिती नाही. मात्र, अशी घरं साकारण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये केलाय. होय. त्यातलं एक घर पक्षांचंय. एक घर फुलपाखरांचय आणि एक घर बिबट्याचंय. याचीच ओळख करून द्यायचा प्रयत्न. यंदा सुरू झालेले हे नवे उपक्रम राज्यभरातील पर्यटकांना नक्कीच आवडतील. नाशिकच्या शिरपेचात एक डौलदार तुरा खोवतील असेच आहेत.
गुजरातची संकल्पना
नाशिकमध्ये पंचवटी परिसरात एक पक्षीघर साकारलंय. खरं तर गुजरात राज्य पक्षीघर ही संकल्पना राबवते. तिथल्या म्हैसने तालुक्यात ठिकठिकाणी अशी पक्षीघरं पाहायला मिळतात. त्याचधर्तीवर नगरसेवक गुरमीत बग्गा यांच्या संकल्पनेतून नाशिक येथे हे पहिलं पक्षी घर विकसित करण्यात आलं. नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अशी पक्षीघरं आगामी काळात साकारण्यात येणार आहेत. त्यातून पक्षांची संख्या वाढावी आणि पर्यटन वाढावे हा स्पष्ट उद्देश आहे. नाशिकमधील वातावरण या साऱ्यासाठी अतिशय पुरकय.
65 फुटी पक्षी घर
नाशिकमधील पंचवटीतील परशुराम पुरिया पार्कमध्ये 65 फुटी पक्षी घर साकारलंय. या पक्षी घराचा बेस जमिनीपासून दहा फूट असून ते एकूण 12 फूट उंच आहे.या अनोख्या संकल्पनेतून पक्षांच्या दाणापाण्याची सोय होणार आहे. रेडिमेड घरट्यामुळं पक्ष्यांच्या संख्येत वाढ होणारय. या पक्षी घरात पक्षांसाठी एकूण 800 रेडिमेड घरटी असून सुमारे 4 हजार पक्षी यात राहू शकणार आहेत. सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या मदतीने या पक्षी घराची देखभाल करण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
1 हेक्टरमध्ये उद्यान
असाच एक नितांत सुंदर प्रयोग नाशिकजवळच्या निफाडमध्ये करण्यात आलाय. निफाडमध्ये एक उद्यान सुरू करण्यात आलंय. तिथं प्राणिमात्रांचा अधिवास दाखविण्यात आलाय. एक हेक्टरमध्ये उभारलेल्या या उद्यानातल्या चिल्ड्रन पार्कमध्ये विविध खेळणी बसवलीयत. विविध सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी रोटन पार्क (सर्प जाती माहिती केंद्र), निफाड मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, ताडोबाचा वाघ, नांदूरमध्यमेश्वर परिसंस्था, ममदापूर राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जिम, औषधी वनस्पती असं बरंच काही इथं पाहायला मिळतं. अतिशय कमी वेळ आणि खर्चात हे दोन्ही प्रयोग राबवलेत. कोणीही नाशिकला यावं. हे साधे, सरळ, सोपे आणि निसर्ग जपणारे प्रयोग पाहावेत. आपल्याही शहरात राबवावेत. त्यावेळी नक्कीच आपल्या घरट्यातून एखादं पिल्लू दिव्य शक्ती घेऊन उडेल.
इतर बातम्याः