चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : नाशिकच्या मोहाडी परिसरातील नामांकित सह्याद्री फार्म कंपनीच्या परिसरात बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी राजकारणात सत्य सांगणे काही कामाचं नसतं, असं म्हटलं. नितीन गडकरी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पणाच्या कार्यक्रमात हजेरी लावलेली. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी आपण गोपीनाथ मुंडे आणि लालकृष्ण आडवाणी या दोनच नेत्यांना वाकून नमस्कार केल्याचा किस्सा सांगितलेला. ते मोकळेपणाने बोलतात. या कार्यक्रमानंतर मोहाडी येथील कार्यक्रमातही त्यांनी मोकळेपणाने भाषण केलं.