‘मी खाली वाकून दोनच व्यक्तींच्या पाया पडलो, एक….’, नितीन गडकरी यांनी सांगितला अनोखा किस्सा

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 8:06 PM

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

'मी खाली वाकून दोनच व्यक्तींच्या पाया पडलो, एक....', नितीन गडकरी यांनी सांगितला अनोखा किस्सा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं चांगलं सहकार्य लाभलं. गोपीनाथ मुंडे हे आपले नेते होते, असं नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. आपण भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर इंदूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. त्यावेळी आपण अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोनच व्यक्तींना वाकून नमस्कार केलेला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते, असं नितीन गडकरी म्हणाले.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भारती पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, दादा भुसे यांच्यासह राज्यातील विविध नेते यावेळी उपस्थित आहे. याच कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

‘गोपीनाथ मुंडे माझे नेते होते याचा अभिमान’

“गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. ज्यावेळी गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. त्यांच्या स्वागताकरता आणि सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो. त्यामुळे राजकारणात ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुणी होतं तर गोपीनाथ मुंडे होते, याचा मला अभिमान आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नितीन गडकरी यांनी वाकून नमस्कार केल्याचा नेमका किस्सा काय?

“यातील एक गंमतीदार घटना आहे. मी ज्यावेळी भाजप पक्षाचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदूरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते. अनेक मोठमोठे नेते बसले होते. मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला. त्यातले एक लालकृष्ण आडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते. गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं, नितीन तू खाली वाकून मला नमस्कार कशाला करतोय? अरे तू आता अध्यक्ष झाला. मी त्यांना तेव्हा सांगितलं, मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली. तुम्ही आणि मी कुठेही गेलो तरी तुम्हीच माझे नेतेच आहात”, असं गडकरी यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात ज्यावेळी भाजप-शिवसेना युतीचं सरकार आलं, मंत्रिमंडळात माझा प्रवेश झाला, त्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात मंत्री झालो. त्यावेळी मुंडेंनी मला बोलावलं आणि विचारलं की, नीतीन आपल्याकडे दोन खाती आहेत. एक ऊर्जा आणि दुसरं बांधकाम खातं. तुला काय पाहिजे? मी म्हटलं, तुम्ही जे खातं द्याल ते खातं मी घेईन. त्यावेळी इनरॉलची चर्चा बरीच सुरु होती. मला ते म्हणाले की, नीतीन इनरॉलमुळे सध्या बरेच वाद वाढले आहेत. हे अडचणीचं आहे. तू बांधकाम विभागाचं खातं घे आणि मी ऊर्जा खातं माझ्याकडे ठेवतो. मी म्हटलं तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. त्यांनी मला बांधकाम विभागाची जबाबदारी दिली”, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.

‘3600 कोटींचा प्रोजेक्ट 1600 कोटींमध्ये केला’

“भाजपमध्ये आमचे नेते तेच होते. मुख्यमंत्री शिवसेनेचे होते आणि उपमुख्यमंत्री भाजपचे होते. त्यानंतर सगळ्यात मोठं समर्थन त्यांचं मिळालं ज्यावेळेस पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेकरता रिलायन्सचं टेंडर 3600 कोटी त्याकाळातलं आलं होतं. मी गोपीनाथ यांच्याकडे गेलो आणि म्हणलो की हे 3600 कोटींचं टेंडर खूप मोठं आहे. यामुळे आपल्यावर टीका होईल. आपण हे रिजेक्ट करु. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून सगळे कागदपत्रे घेतले आणि ते रिजेक्ट केलं. त्यानंतर 3600 कोटींचं काम आम्ही 1600 कोटींमध्ये केलं”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI