Video : वाट चुकलेले बिबट्याचे बछडे शेतकरी कुटुंबात आठवडाभर विसावले! मादी न परतल्यानं वनविभागाच्या स्वाधीन

| Updated on: May 11, 2022 | 5:35 PM

बछडे आठवडाभर शेतकरी कुटुंबाच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या बछड्यांची आई म्हणजेच मादी बिबट्या परत न आल्याने शेतकरी कुटुंबानं हे बछडे वनविभागाच्या स्वाधीन केले.

Video : वाट चुकलेले बिबट्याचे बछडे शेतकरी कुटुंबात आठवडाभर विसावले! मादी न परतल्यानं वनविभागाच्या स्वाधीन
शेतकरी कुटुंबाकडून बिबट्यांच्या बछड्यांचा आठवडाभर सांभाळ
Image Credit source: TV9
Follow us on

मनोहर शेवाळे, मालेगाव : बिबट्या म्हटलं की घाबरगुंडी उडते, घाम फुटतो. अशावेळी बिबट्याचे बछडे (Leopard calves) मालेगावातील एका शेतकरी कुटुंबात (Farmer Family) तब्बल आठवडाभर वाढली! ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण त्याचं झालं असं की मालेगावातील एका शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. हे बछडे आठवडाभर शेतकरी कुटुंबाच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या बछड्यांची आई म्हणजेच मादी बिबट्या परत न आल्याने शेतकरी कुटुंबानं हे बछडे वनविभागाच्या (Forest Department) स्वाधीन केले. यावेळी शेतकरी कुटूंबालाही गहिवरून आलं होतं.

मालेगावच्या मोरझर शिवारातील रावसाहेब गंगाराम ठाकरे यांच्या शेतातील घराजवळ मांजरीच्या पिल्लासारखं दिसणारं एक पिल्लू घरातील लहान मुलांना दिसलं. मांजरीपेक्षा वेगळा रंग आणि दिसायला गोंडस असल्याने घरातील लहानगेही या पिलासोबत खेळू-बागडू लागले. ते पिल्लूही ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांसोबत चांगलंच रमलं. मात्र, हे मांजरीचं पिल्लू नसून बिबट्याचे बछडे असल्याचं लक्षात येताच घरातील लोकांना चांगलाच घाम फुटला.

मादी आपल्या बछड्यांना घ्यायला आलीच नाही!

काही क्षण घाबरलेल्या ठाकरे कुटुंबानं सावधगिरी बाळगत त्या बछड्याचा सांभाळ केला. त्याला दररोज दीड लिटर दूध पाजलं. इतकंच नाही तर रोज रात्री घराबाहेर ठेवून त्याची आई अर्थात मादी बिबट्या त्यांना घेऊन जाईल अशीही काळजी घेतली. मात्र वाट चुकलेली बिबट्याची मादी आपल्या बछड्याला घ्यायला आली नाही.

हे सुद्धा वाचा

शेतकरी कुटुंबाकडून बिबट्याच्या बछड्यांचा आठवडाभर सांभाळ

बछडे वन विभागाच्या ताब्यात

या काळात ठाकरे यांच्या कुटुंबातील दीड वर्षांच्या तन्वी या मुलीसोबत बछड्याची भावनिक नाळ जोडली गेली. आठवडाभर बच्छडा तन्वीच्या अंगावर मस्ती करीत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. आठवडा उलटला तरी बछड्याची आई न आल्याने हताश झालेल्या कुटुंबियांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्यांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आता त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.