फांद्या तोडण्याच्या नावाखाली झाडावर इलेक्ट्रिक कटर, 15 बगळ्यांच्या मृत्यूने हळहळ

| Updated on: Aug 02, 2021 | 11:29 AM

गंगापूर रोड परिसरात एका झाडाच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली ठेकेदाराने सर्रास या झाडावर इलेक्ट्रिक कटर चालवलं. मात्र झाडाच्या फांद्या कोसळणाबरोबरच झाडावर असलेल्या बगळ्यांचे घरटे एकामागून एक खाली पडू लागले.

फांद्या तोडण्याच्या नावाखाली झाडावर इलेक्ट्रिक कटर, 15 बगळ्यांच्या मृत्यूने हळहळ
झाड तोडल्याने बगळ्यांचा मृत्यू
Follow us on

नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका झाडावर कुऱ्हाड चालवण्याच्या नादात, झाडावरच्या घरट्यांमध्ये असलेल्या बगळ्यांचा आणि त्यांच्या पिल्लांचा जीव गेला आहे. तब्बल 15 बगळे आणि पिल्लांचा मृत्यू झाल्याने वृक्षप्रेमी आणि पक्षीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. झाड तोडणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

गंगापूर रोड परिसरात एका झाडाच्या फांद्या तोडण्याच्या नावाखाली ठेकेदाराने सर्रास या झाडावर इलेक्ट्रिक कटर चालवलं. मात्र झाडाच्या फांद्या कोसळणाबरोबरच झाडावर असलेल्या बगळ्यांचे घरटे एकामागून एक खाली पडू लागले. ठेकेदाराच्या या हलगर्जीपणात बगळ्यांची पिल्लं आणि काही बगळे देखील मृत झाले आहेत. रस्त्यावर पडलेले बगळ्यांची पिल्लं बघून काही नागरिकांनी त्यांना उचलून बाजूला ठेवलं आणि तात्काळ वन विभागाला फोन लावला. मात्र वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत अनेक बगळे आणि त्यांच्या पिलांचा तडफडून मृत्यू झाला होता. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

जखमी बगळ्यांवर उपचार

दरम्यान, वन विभागाने काही जखमी बगळ्यांना आणि त्यांच्या पिल्लांवर उपचार केले आहेत. मात्र पक्षीप्रेमी आणि वृक्षप्रेमींनी या प्रकरणाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. सर्वसामान्यांवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या प्राशासनाने ठेकेदाराच्या या मनमानीकडे केलेली डोळेझाक या बगळ्यांच्या आणि त्यांच्या पिल्लांच्या जीवावर बेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात माशांच्या जाळ्यात अडकून 18 पक्षांचा मृत्यू

VIDEO | पक्ष्याचा जोडीदाराचा रस्त्यावर मृत्यू, साथीदाराच्या मृत्यूनंतर पक्ष्याने केले असे काही की तुम्हालाही रडू कोसळेल!