ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 जवान शहीद, नाशिकच्या खड्ड्यात 10 जण गेले, महापालिकेवरच गुन्हा दाखल करा; राऊत यांचा हल्लाबोल

नाशिकमधील खड्डेग्रस्त रस्त्यांमुळे झालेल्या 10 मृत्यूंवरून संजय राऊत यांनी मनपावर जोरदार हल्ला चढवला आहे. "ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवानांप्रमाणेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्यांनाही 1 कोटी नुकसान भरपाई मिळावी," अशी मागणी त्यांनी केली. नाशिक मनपा व आयुक्तांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी असून, त्यांनी नाशिकच्या रस्त्यांवरील गंभीर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 जवान शहीद, नाशिकच्या खड्ड्यात 10 जण गेले, महापालिकेवरच गुन्हा दाखल करा; राऊत यांचा हल्लाबोल
Sanjay Raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 10:44 AM

ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 जवान शहीद झाले. नाशिकच्या खड्डयात 10 जणांचा मृत्यू झाला. खड्ड्यांविरोधातील हे किती मोठं युद्ध आहे हे दिसतं. खड्ड्यात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना फक्त 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. जीवाची किंमत फक्त 5 लाख रुपये आहे का? त्यांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी करतानाच नाशिकच्या खड्डे प्रकरणी नाशिक महापालिका आणि नाशिकच्या पालिका आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. आज शिवसेनेने नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महापालिका आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. नाशिकमध्ये 10 लोक मरण पावले. महापालिकेच्या आणि भाजपच्या हलगर्जीपणामुळे या लोकांचे मृत्यू झाले. त्यावर शेखर सिंग यांनी माफी मागितली. ही संवेदना आहे. पण महापालिका आयुक्तांनी मागितली का? महापौरांनी मागितली का? गिरीश महाजन यांनी माफी मागितली का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

1 कोटी नुकसान भरपाई द्या

10 लोकांचा मृत्यू ही साधी गोष्ट आहे का. ऑपरेशन सिंदूरमध्ये 6 सैनिक शहीद झाले. नाशिकमध्ये 10 लोक मेले. विचार करा. किती मोठं युद्ध या खड्ड्यांचं सुरू आहे. काय त्यांना नुकसान भरपाई दिली? तर 5 लाख रुपये. जीवाची किंमत काय 5 लाख रुपये आहे का? मृतांच्या कुटुंबीयाांना एक कोटी रुपये दिले पाहिजे. जखमींना 50 लाख द्या. 100च्यावर जखमी आहेत. काही कोमात आहेत. काही कोमात आहेत. अनेकांची रुग्णालयाची 10 लाखाच्यावर बिलं झाली आहेत. गरीब लोक कुठून आणणार एवढा पैसा? महापालिका म्हणते, आम्हाला मर्यादा आहे. मग ठेकेदारांच्या घरी जा आणि त्यांच्या कपाटून पैसे काढून द्या. खड्ड्यात पडून 10 लोकांचा मृत्यू झाला. या महापालिका जबाबदार आहे. त्यामुळे महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आयुक्तांवर गुन्हा दाखल करा. अडचण असेल तर प्रायव्हेट गुन्हे दाखल करा. 10 खून केले यांनी. मर्डरचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी राऊत यांनी केली.

त्या खड्ड्यात नगरसेवकांना टाका

त्र्यंबक रोडवर मी पाहणी केली. नाशिक विद्रूप झालेलं दिसतं. नाशिक असं दिसेल अशी कल्पनाही केली नव्हती. नाशिकचे खड्डे देशभरातील चेष्टेचा विषय झाला आहे. 10 वर्षापूर्वी खड्डे मुक्त शहर असा नाशिकचा लौकिक होता. पण आजचं चित्र अत्यंत भयंकर आहे. आम्ही मखमलाबाद रोडवर काल गेलो. वाईट वाटलं. ज्या पद्धतीने तिथले लोकं रस्त्यावर भाज्या फळे विकणारे लोकं डोळ्यात पाणी आणून बोलेत होते. नाशिकच्या रस्त्यावर स्विमिंग पूलच झाले आहे. नाशिकमध्ये एवढे मोठे खड्डे आहेत की त्यात भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील. छोट्या खड्ड्यात मिंधे गटाचे लोक टाकता येतील, असंही ते म्हणाले.

नगरसेवकांच्या घरासमोर आंदोलन करू

आम्ही विरोधी पक्षात आहोत. आमचे 15 नगरसेवक सातत्याने आवाज उठवत आहेत. आम्ही रस्त्यावर आंदोलन करत आहोत. आजचा मोर्चा नाशिकच्या सुरक्षेसाठी आहे. काल दोन मुली भेटल्या. मुलांना शाळेत पाठवायला भिती वाटते म्हणाल्या, असं सांगतानाच नाशिकच्या आयुक्तांची बदली करा. त्यांना कुणी आणले? त्यांच्या चेहऱ्यावर संवेदना दिसते का? कधी फिरले का रस्त्यावर? त्यांना सोबत घ्या आणि नाशिकच्या रस्त्यावर फिरवा. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे. आम्ही सर्वांना आवाहन केलं. रिक्षावाले सहभागी होतील. हे आंदोलन थांबणार नाही. जिथे खड्डे आहेत, त्या भाजपच्या नगरसेवकांच्या घरांसमोर आंदोलन करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न

ते कुंभमेळा मंत्री नाही. ते कुंभकर्ण मंत्री आहेत. सर्व झोपले आहेत. मोदी-फडणवीस 2047च्या विकासाच्या गप्पा मारतात. शहरात खड्डे आहेत. कुंभमेळ्याचं बजेट 15 हजार कोटीवरून 45 हजार कोटीवर गेलं. व्हीआयपी टॉयलेटच्या नावाखाली पैसे खात आहेत. हा भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us