वन्यजीव अपंगालयाचा रचला पाया; नाशिकमध्ये भुजबळांनी फोडला उद्घाटनाचा नारळ

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत 'ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ वन्यजीव अपंगालय उभारण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वन्यजीव अपंगालयाचा रचला पाया; नाशिकमध्ये भुजबळांनी फोडला उद्घाटनाचा नारळ
नाशिकमध्ये वन्यजीव अपंगालयाच्या इमारतीच्या पायाचे भूमिपूजन छगन भुजबळ यांनी केले.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Oct 04, 2021 | 4:50 PM

नाशिकः पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवणे हे वन्य जीवांच्या रक्षणाचे परंपरागत उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यात शासनस्तरावर सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ वन्यजीव अपंगालय उभारण्यात येत असून ही अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. सृष्टी वाचविण्यासाठी वन्यजीवांचे जतन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

वन्यजीव सप्ताहांतर्गत आज म्हसरूळ येथील निसर्ग संरक्षण व वन्यजीव व्यवस्थापन या योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ या प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनरक्षक पूर्व तुषार चव्हाण, उपवनरक्षक पश्चिम पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे तसेच वनविभागातील इतर पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्हा वनविभागांतर्गत नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, पेठ, बा-हे, हरसुल, ननाशी असे एकूण ८ वनक्षेत्र असून, दिंडोरी, निफाड व सुरगाणा या तालुक्यांचा अंशत: समावेश होतो. जिल्ह्यातील पश्चिम विभाग क्षेत्रात प्रामुख्याने बिबट, तरस, कोल्हा, ससा, मोर, माकड, उद मांजर इत्यादी वन्यप्राणी आढळून येतात. तसेच नाशिक, सिन्नर व इगतपुरी वनक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या अपंगालयाच्या माध्यमातून जखमी व आजारी वन्यप्राणी व पक्षी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, वन्यजीवांसाठी उभारण्यात येणारे हे अपंगालय वन्यप्राण्याच्या जीवदानासाठी वरदान ठरेल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

प्राण्यांसाठी पिंजऱ्याची सोय

वन्यप्राणी बिबटासाठी 8 पिंजरे, वाघासाठी 2 पिंजरे, कोल्ह्यासाठी 5 पिंजरे तसेच माकड व हरिण या प्राण्यासाठी दोन पिंजरे असणार असून, या सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळा स्वतंत्र विभागही असणार आहे. त्याबरोबरच उभारण्यात या अपंगालयात उपचारासाठी स्वतंत्र कक्ष अतिदक्षता विभाग, अन्न व औषंधांच्या उपलब्धतेसाठी साठवण गृह इत्यादींचीही सोय करण्यात येणार आहे. सदर वन्यजीव अपंगालय इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 4 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या ‘ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर’ चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, जेणेकरुन उपचारा अभावी कोणताही वन्यप्राणी मृत पावणार नाही व वन्यप्राणी संख्या देखील अबाधित ठेवता येईल, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी योवेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा सन्मान

यावेळी वन्यप्राण्यांच्या जतन व संवर्धनासाठी ग्रामीण भागात वन विभागांतर्गत स्थानिक लोकांच्या मदतीने संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत वनीकरण, वनसंरक्षक, वन वनवा प्रतिबंधक, वन्यप्राणी व पक्षी यांना जीवदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांपैकी जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार 51 हजार गाव चिमणपाडा, द्वितीय पुरस्कार 31 हजार सुरगाणा तालुक्यातील निंबरपाडा, तृतीय पुरस्कार 11 हजार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गाव हर्षवाडी यांना प्राप्त झाला असल्याने या पुरस्कार्थींचा यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह तसेच धनादेश व पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला.

इतर बातम्याः

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा; उत्तर महाराष्ट्रात 5210 शाळा सुरू, प्रवेशोत्सव सोहळा रंगला!


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें