ओव्हरटेक केल्यामुळे राग, गाडी रस्त्यात थांबवून हेल्मेटने मारहाण, ब्रेन हॅमरेजमुळे तरुणाचा मृत्यू

खारघरमधील उत्सव चौकात रविवारी रात्री झालेल्या रस्त्यावरील वादात ४५ वर्षीय शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाला. ओव्हरटेकिंगच्या वादातून झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला हेल्मेटने वार केले गेले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

ओव्हरटेक केल्यामुळे राग, गाडी रस्त्यात थांबवून हेल्मेटने मारहाण, ब्रेन हॅमरेजमुळे तरुणाचा मृत्यू
kharghar helmet attack
| Updated on: Feb 03, 2025 | 11:41 PM

महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता खारघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खारघरच्या उत्सव चौकात एका दुचाकी स्वाराला हेल्मेटने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे त्या तरुणाला ब्रेन हॅमरेज झाला. त्यानतंर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवकुमार शर्मा (45) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी २ फेब्रुवारी रात्री खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या दरम्यान दोन दुचाकीस्वारांचे भांडण झाले. सतत ओव्हरटेक करणे, तसेच हुलकावणी देणे या क्षुल्लक कारणाने त्यांच्यात वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी ओव्हरटेक करणाऱ्या दोन तरुणांनी शिवकुमार यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेटने प्रहार केले. यामुळे शिवकुमार हे गंभीर जखमी झाले. याच जखमी अवस्थेत स्वत: दुचाकी चालवत ते खारघर पोलीस स्टेशनला पोहोचले.

खारघर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर शिवकुमार यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनीही त्यांची तक्रार लिहून घेतली. तक्रार लिहिण्याच्या अखेरच्या क्षणी शिवकुमार शर्मा हे बेशुद्ध झाले. यावेळी पोलिसांनी शिवकुमार शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलिसांकडून शोध सुरु

या घटनेनंतर सध्या नवी मुंबई पोलीस हे या प्रकरणाचा शोध घेत आहेत. सध्या पोलीस 22 वर्षीय हिरव्या रंगाचा आणि 25 वर्षीय काळ्या रंगाच्या झब्बा घातलेल्या संशयित मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या २२ ते २५ वयोगटातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची १५ वेगवेगळी पथक कार्यरत करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर २२ तास उलटले आहेत. तरी अद्याप नवी मुंबई पोलीस या मारेकऱ्यांना पकडू शकले नाहीत.