दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी सुरूच

दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी सुरूच
cm uddhav thackeray

प्रश्न विचारायला काय अक्कल लागते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला होता. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला होता.

हेमंत बिर्जे

| Edited By: भीमराव गवळी

Jan 16, 2022 | 2:25 PM

नवी मुंबई: प्रश्न विचारायला काय अक्कल लागते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला होता. त्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला होता. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. दुगाण्या झाडायला अक्कल काय अक्कल लागते? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फुटबॉल खेळाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना शालजोडीतून फटकारे लगावले. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटबोट सेवेचे लोकार्पण करताना प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यावर विरोधकांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्या टीकेला उद्धव ठाकरेंनी सव्याज परतफेड केली आहे. फुटबॉल हा पायाने खेळायचा खेळ जरी असला तरी यासाठी डोकं लागतं. बुद्धीबळ खेळताना जसा विचार करावा लागतो, तसाच फुटबॉल खेळताना विचार करावा लागतो. फुटबॉल खेळताना अत्यंत वेगात निर्णय घ्यावा लागतो, असं सांगतानाच दुगाण्या झाडायला काय अक्कल लागते? दुगाण्या झाडायच्या तर रोज दुगाण्या झाडत असतो. परंतु त्या दुगाण्या झाडणं वेगळं, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

फुटबॉलमध्ये दरारा व्हावा

मला आजही फुटबॉलमधले काहीच कळत नाही. फुटबॉल हा पायाने खेळायचा जरी खेळ असला तरी त्याच्यामध्ये डोकं वापरावं लागतं. इतक्या वेगाने हा खेळ खेळावा लागतो आणि त्यासाठी वेगानेच विचार करावा लागतो. माझी इच्छा अशी आहे की, फुटबॉलच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघाचाही दरारा निर्माण झाला पाहिजे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची टीम कधी अर्धवट काम करणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या कामाला सरकार नुस्ती मदत नाही तर प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही. फुटबॉलमधले जास्त काही कळत नसल्यामुळे उगाच काही अज्ञान प्रकट करु इच्छित नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला संघाला शुभेच्छा

तसेच लवकरच या मैदानावर महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा (AFC Women Asian Cup 2022) होतेय, त्यासाठी शुभेच्छा. आपला संघ यात चांगली कामगिरी करेल, अशी इच्छा आणि अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी AFC महिला आशिया चषक भारत 2022 स्पर्धेच्या स्थानिक कार्यक्रमासाठी सुरक्षा प्रोटोकॉलवर चर्चा केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) अध्यक्ष आणि LOC चे चेअरमन प्रफुल्ल पटेल, AIFF सचिव कुशल दास आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी “महाराष्ट्रातील परिस्थितीची पाहणी केली आणि स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे”. यात सविस्तर योजना आखण्यात आली आहे. सर्व सहभागींना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान केली जाईल.

मातीशी नाळ जोडली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित होत असताना सध्याच्या पिढीची मैदानाशी, मातीशी नाळ तुटत चालली आहे. मात्र या उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून ही नाळ मातीशी पुन्हा जोडली जाईल. आरोग्यदायी जीवनासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. खारघर येथे निर्माण झालेले हे उत्कृष्टता केंद्र नव्या पिढीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. येथे विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, याहून अधिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यासाठी नगरविकास विभाग, सिडको यांनी आतापर्यंत केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे.

स्पोर्ट्स सिटीचा उदय

खारघर हे शहर भविष्यात “स्पोर्टस् सिटी” म्हणून नावारूपाला येईल, यात शंकाच नाही. या ठिकाणी “सर्व खेळांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा एकाच शहरात” ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेवटी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या मैदानात सराव करणारा हिंदुस्थानचा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर विजेता संघाच्या रूपात दिसावा, जागतिक पातळीवर हिंदुस्तानच्या संघाचा दरारा निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले. नव्या पिढीचा आवडता खेळ फुटबॉलच्या विकासाकरिता महाराष्ट्र शासनाचे उत्तम सहकार्य मिळत आहे. या उत्कृष्टता केंद्राच्या व मैदानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम खेळाडू घडतील, असे सांगून महाराष्ट्र राज्याचा आणि देशाचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वजण मिळून सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. तसेच याच मैदानात लवकरच एएफसी वूमेन एशियन कप इंडिया 2022 चे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील हे उत्कृष्टता केंद्र एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे सांगून नवी मुंबई शहर हे एज्युकेशन सिटी, आयटी सिटी याबरोबरच आता “स्पोर्टस् सिटी” म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

नव्या पिढीसाठी पर्वणी

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी फुटबॉल प्रेमी नव्या पिढीसाठी हे केंद्र एक पर्वणी ठरणार असून येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. खारघर, नवी मुंबई, पनवेल हे विविध खेळ व त्या खेळांसाठीच्या सोयीसुविधांचे केंद्रबिंदू होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले खेळाडू, संघ आपल्या महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नाव मोठे करतील, असे सांगितले.

क्रीडा क्षेत्रातील मानाचा केंद्रबिंदू

राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे या म्हणाल्या, नव्या पिढीचा फुटबॉल हा आवडता खेळ आहे. येत्या काळात पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या पार्श्वभूमीवर या उत्कृष्टता केंद्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित होतील. ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी हा प्रकल्प निश्चितच लाभदायक राहील. यातून उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले जातील, त्यामुळे हा प्रकल्प क्रीडा क्षेत्रातील एक मानाचा केंद्रबिंदू ठरेल.

संबंधित बातम्या:

नुसतं स्टेडियम उभारुन चालणार नाही, फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताचा दरारा निर्माण व्हावा: उद्धव ठाकरे

Kiran Mane : मी बी कंबर कसलेली हाय… फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेते किरण माने यांनी दिला इशारा!

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह : राजेश टोपे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें