Navratri 2025 : गाभाऱ्यात प्रवेश बंद, चोख सुरक्षा अन्… राज्यात नवरात्रीचा उत्साह शिगेला, मंदिरांमध्ये नवे नियम काय?
महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाची जल्लोषात साजरे होत आहेत. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर, पुण्यातील चतु:श्रुंगी आणि नागपूरच्या कोराडी मंदिरात लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.

महाराष्ट्रामध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. उद्यापासून (२२ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी राज्याच्या प्रमुख देवींच्या मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरापासून ते पुण्याच्या चतु:श्रुंगी आणि नागपूरच्या कोराडी मंदिरातही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि मंदिर समित्यांनी सुरक्षेचे आणि सोयीसुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात तगडी सुरक्षा व्यवस्था
मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेची आणि सोयीची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. यासाठी मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तब्बल ७७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आणि बॅग स्कॅनिंगची सुविधा असणार आहे. तसेच भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी भुलाबाई देसाई मार्गावर एक मोठा मंडप उभारण्यात आला आहे. इथे दर्शनरांगेची सोय करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था आणि आवश्यक वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका देखील उपलब्ध असणार आहे.
तसेच नवरात्रीच्या काळात मंदिर सकाळी ५:३० वाजता उघडेल. या दरम्यान रात्री १० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. या काळात गाभाऱ्यात प्रवेश बंद असला तरी सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या आरत्या निर्धारित वेळेनुसार होतील. तसेच मंदिराच्या सुरक्षिततेची जबाबदारी गावदेवी पोलिसांकडे असेल. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ताडदेव पोलीस काम पाहणार आहेत.
पुणे आणि नागपूरमध्येही उत्सवाची तयारी
पुण्यातील चतु:श्रुंगी मंदिरात उद्या सकाळी ८:३० वाजता घटस्थापना होईल. त्यानंतर देवीचा अभिषेक आणि महापूजा केली जाईल. नऊ दिवसांच्या काळात ७२ भजनी मंडळांकडून भजन सादर होणार आहे. भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच नागपूरच्या प्रसिद्ध कोराडी देवीच्या मंदिरात विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून भाविक दर्शनासाठी येतात. यंदा ५,५५१ घटांची स्थापना केली जाणार आहे. सुरक्षिततेसाठी २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नवरात्रीनिमित्त वाहतुकीचे विशेष नियोजन
नागपूरमध्ये नवरात्र आणि धम्मचक्र दिनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने ११० आपली बस आरक्षित केल्या आहेत. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस आणि कोराडी ते सीताबर्डी दरम्यान या बसेस धावतील. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात आंबेडकरी अनुयायांच्या सोयीसाठी हे विशेष नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवानंतर लगेचच नवरात्रोत्सव येत असल्याने मूर्तीकारांची लगबग पाहायला मिळत आहे. मूर्ती घडवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आकर्षक रंगकाम आणि सजावट सुरू आहे. यंदा ७ ते ८ फूट उंचीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. मर्यादित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी कारागीर रात्र-दिवस काम करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात रासगरबा आणि दांडियाचा उत्साह संचारला आहे. अनेक ठिकाणी महिला आणि मुली प्रशिक्षणासाठी गर्दी करत आहेत. शहरांमधील मंगल कार्यालये आणि सोसायट्यांमध्ये दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नृत्यांतून भारतीय परंपरा जपण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
