
आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गोंदियात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिले.
युतीचा विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे, युतीचं कसं जमलं तर केलं पाहिजे, नाही जमलं तर सोडून दिलं पाहिजे. हे असं आमचं धोरण ठरलं आहे. कारण सगळीकडे युती होऊ शकत नाही. प्रभागामध्ये आपल्याकडे उमेदवार असेल. युतीतील सर्व घटक पक्षाकडे उमेदवार असतील तरी आपल्या पक्षातल्या उमेदवाराला संधी न देणं, दुखावणं हे मला योग्य वाटत नाही, म्हणून जिथे सोयीचं वाटेल तिथे युती बघू. नगराध्यक्षाच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सगळ्यांच्या मतदानाची आवश्यकता पडते. त्यामुळे एखाद्यावेळी विचार करू, त्यामध्येही खात्री मी देत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आपल्या ताकदीच्या हिशोबाने मिळत असेल, तर आपण विचार करू. मागच्या वेळी कोणा दुसऱ्याकडे होता तर आताही त्यांच्याकडेच राहील, असं नाही. या नगरपालिकेमध्ये काही देण्याचं ठरलेलं नाही. त्यामुळे माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण आज प्रत्येक प्रभाग आणि नगराध्यक्ष आपण लढणार आहोत. या हिशोबानेच आपण कामाला लागलं पाहिजे. नाहीतर आपण गफलत मध्ये राहू, असे प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले.
महिला आली तर महिला कोण उभी राहील? ओबीसी आला तर ओबीसी मध्ये कोण? जनरल आला तर कसं? एससी एसटी रिझर्वेशन आला तर कसं? या सर्व बाबींचा आपण विचार केला पाहिजे. एसी वर्ग मोठा आहे? मुस्लिम वर्ग मोठा आहे? हेही लक्षात ठेवून घड्याळाला इतरांपेक्षा मतदान जास्त मिळतील ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. घड्याळाला मतदान करणारा वर्ग थोडा भिन्न आहे. आपल्याला ते मिळू शकते. त्यामुळे हाही विचार करायला हवा….. त्यावर आपण अंतिम निर्णय घेऊ.! असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आपले कोणी शत्रू नाही. आपला पक्ष वाढवायला संकोच करायचं नाही. दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांना घ्या वेलकम करा, असा कानमंत्रही प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना बैठकीदरम्यान दिला.