NCP Sharad Pawar : वळसे पाटील-शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं? विलिनीकरणावर…खुद्द वळसे पाटलांनीच सगळं सांगितलं!

राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. याच भेटीवर आता वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

NCP Sharad Pawar : वळसे पाटील-शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं? विलिनीकरणावर...खुद्द वळसे पाटलांनीच सगळं सांगितलं!
dilip walse patil and sharad pawar meeting
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 5:25 PM

Sharad Pawar And Dilip Walse Patil Meeting : सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हा पक्ष लवकरच एनडीएत सामील होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या दाव्यावर  पवारांच्या कोणत्याही नेत्याने अद्याप थेट स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलिकडेच सुप्रिया सुळे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्याही भेटीला पोहोचल्या आहेत. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी थेट शरद पवार यांची भेटी घेतली आहे. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पवार-वळसे पाटील बैठकीत नेमकं काय-काय घडलं हे समोर आलं आहे.

नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा?

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना आमची ही कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. रयत शिक्षण संस्थेसंदर्भातील पूर्व नियोजित बैठक होती. चंद्रकांत दळवी, भगीरथ शिंदे आदी या बैठकीला उपस्थित होते. गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे शरद पवार यांना फुलं देऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. रयत शिक्षण संस्थेबाबत चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं.

शरद पवार नेहमी सांगतात…

माझ्या या भेटीत शरद पवार यांच्यासोबत राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देता येणार नाही.  काम करत राहा. लोकांसाठी काम करत राहा असं ते शरद पवार नेहमी सांगत असतात. शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरुचे आशीर्वाद घेतले पाहिजे. सर्वांचेच आशीर्वाद घेतले पाहिजे. पवार साहेबांचे आशीर्वाद घेतले तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांचे आशीर्वाद घेणार आहे, असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही विधान केलं. विलिनीकरणाबाबत मला माहीत नाही. माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर बोलतील, असे वळसे पाटील म्हणाले. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us