होय अजितदादा खरंच मुख्यमंत्री होणार होते, बारामतीच्या होस्टलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या संदर्भात काही नेत्यांकडून मोठे दावे देखील करण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. सध्या विलिनीकरणाची चर्चा नाही. परंतु अजितदादा असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, तशी त्यांनी मला कल्पना दिली होती, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी देखील मोठा दावा केला आहे. महायुतीमधून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजित पवार यांचा प्लॅन होता, असं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अतुल लोंढे यांच्या या नव्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होत असताना, काल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की अजितदादा हे महायुतीमधून बाहेर पडणार होते, होय हे खरं आहे, असं लवांडे यांनी म्हटलं आहे. 19 जानेवारी 2026 ला मी स्वतः आमदार रोहित पवार यांच्यासोबत पुण्यातील बारामती होस्टेल येथे अजितदांदासोबत चर्चा केली होती.
स्वतः अजितदादा यांनी सांगितलं होतं की, आपलं फार काळ भारतीय जनता पार्टीबरोबर जमनार नाही, कारण तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. 2028 ला आपण बाहेर पडणार आहोत, एकत्रित आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे अजित पवार यांचे शब्द होते. अजित पवार हे भारतीय जनता पार्टीला कंटाळले होते त्यांच्या, कारभाराला कंटाळले होते ते यातून बाहेर पडणार होते हे सत्य आहे, असं लवांडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान लवांडे यांच्या दाव्यामुळे आता विलीनीकरणाच्या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.