Ajit Pawar Plane Crash : देवगिरीवर स्मारकापासून पारदर्शक चौकशीपर्यंत, रोहित पवारांच्या मुख्यमंत्र्‍यांकडे 10 मोठ्या मागण्या काय?

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांचे स्मारक उभारण्याची आणि विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Ajit Pawar Plane Crash : देवगिरीवर स्मारकापासून पारदर्शक चौकशीपर्यंत, रोहित पवारांच्या मुख्यमंत्र्‍यांकडे 10  मोठ्या मागण्या काय?
rohit pawar devendra fadnavis (1)
| Updated on: Feb 27, 2026 | 2:06 PM

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामतीतील दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. या भीषण अपघातानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया आणि मागण्या जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी लावून धरली आहे. याच अनुषंगाने रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंधित विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुंबई किंवा बारामती कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार का नोंदवली जात नाही, असा सवाल विचारला. यासोबतच त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत मुख्यमंत्र्‍यांना काही विनंती केल्या आहेत.

रोहित पवारांनी मुख्यमंत्र्‍यांकडे केलेल्या मागण्या काय?

  1. देवगिरी बंगल्यात स्मारक: अजित दादा गेल्या २० ते २२ वर्षांपासून ज्या देवगिरी बंगल्यात राहत होते, त्या बंगल्यात दादांचे स्मारक उभारावे, जेणेकरून त्यांच्या आठवणी जपल्या जातील.
  2. विधीमंडळ परिसरात स्मारक: विधानसभेच्या अध्यक्षांनी विधीमंडळ परिसरात अजित दादांचे स्मारक असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्याला पाठिंबा देत, सरकारने या स्मारकाला तातडीने परवानगी द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा.
  3. विमानतळाला अजित पवारांचे नाव: बारामती विमानतळाला अत्याधुनिक करण्यासाठी आणि नाईट लँडिंगची सुविधा करण्यासाठी अजित पवारांनी विशेष फंड दिला होता. तो फंड तात्काळ विमानतळासाठी वर्ग करावा आणि या विमानतळाला अजित दादांचे नाव देण्यात यावे.
  4. पुणे रिंग रोडला नाव: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्यावे.
  5. एलिवेटेड रस्त्यांना नाव: तळेगाव, चाकण, शिक्रापूर जो एलिवेटेड रस्ता आहे, तसेच पुणे-शिरूर एलिवेटेड रस्त्याला अजित पवारांचे नाव देण्यात यावे. अजित पवार अनेक वर्षे पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. त्यांनी सातत्याने या गोष्टींसाठी पुरावा केला.
  6. सिक्युरिटी ऑफिसरच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी: अपघातात मृत्यू पावलेल्या सुरक्षा अधिकारी जाधव यांच्या पत्नी ठाणे महापालिकेत कंत्राटी पदावर काम करत आहेत. त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी. मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून नियुक्ती प्रक्रियेत मदत करावी.
  7. फ्लाईट अटेंडंटच्या मुलाला नोकरी: या भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या फ्लाईट अटेंडंट माळी यांच्या मुलाला सध्या कंत्राटी नोकरी मिळाली आहे, परंतु पगार अत्यंत कमी आहे. त्यांची बहीण जास्त पगाराच्या नोकरीवर होती, ज्यावर घर चालत होते. त्यामुळे त्यांच्या भावाला आणि माळी कुटुंबातील मुलाला चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
  8. को-पायलटच्या इच्छेचा सन्मान: को-पायलट पाठक यांची एक व्यक्तिगत इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली सरकारशी संवाद साधून पाठपुरावा करावा.
  9. कुटुंबाच्या मदतीसाठी आश्वासन: मृत अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतली आहे, तरीही सरकारने त्यांना पाठबळ द्यावे.
  10.  पारदर्शक चौकशी: या संपूर्ण विमान अपघाताची पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य परिस्थिती समोर येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us