
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बारामतीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर चौथ्या दिवशी अजित पवार यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही सर्वानुमते निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका, सभा, दौरे यांना आता सुरूवात झाली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक मोठी अपडेट समोर आलीआहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री उशीरा, मुंबईतील देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवार या आमदारांनी भेटल्या. या भेटीत आमदारांकडून डीजीसीएच्या अहवालाबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याचे समजते. अजित पवारा यांच्या अपघातानंतर महिन्याभराने डीजीसीएचा अहवाल समोर आला. मात्र त्या अहवालातील त्रुटी दाखवत तसेच अजित दादांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून देखील अद्याप का नेमण्यात आलेली नाही, याबाबत आमदारांकडून सवाल उपस्थित करण्यात आले.
सुनेत्रा पवारांकडून आश्वासन
या अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनेक शंका असून, सदर शंकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वांनी एकत्रित भेट घेण्याबद्दल आमदारांनी सुनेत्रा पवार यांना विनंती देखील केली. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना एकत्रित भेटू असं आश्सावन यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिलं. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचा विमानन अपघातात मृत्यू झाला, त्या अपघातानंतर ज्या वस्तू मिळाल्या, त्याही यावेळी आमदारांना दाखवण्यात आल्या, अशी माहिती समोर आली आहे.
आमदारांमध्ये अस्वस्थता ?
शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातावर सातत्याने भाष्य केलं आहे. अपघात कसा झाला? त्यमागचे सूत्रधार कोण? यावर रोहित पवार बोलत आहेत. प्रझेंटेशन देऊन समजावत आहेत. तसेच अजितदादांचा घातपातच झालाय असंही वारंवार सांगून कारवाईची मागणी करत आहेत. याशिवाय या अपघाताची क्रिमिनल अँगलने चौकशी करण्यासाठी एफआयआर घेण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. मात्र, एफआयआर नोंदवून घेतला जात नाही.
या अपघाताची चौकशी व्हावी म्हणून रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे यांचीही भेट घेऊन चर्चा केली. तसेच राहुल गांधी यांचीही भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार आहेत. रोहित पवार या प्रकरणाचं सत्य बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असताना अजितदादांच्या पक्षातून मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाही. अमोल मिटकरी वगळता या प्रश्नावर पक्षातील वरिष्ठ नेते भूमिका घेताना दिसत नसून प्रयत्नही करताना दिसत नसल्याने अजितदादांच्या पक्षातील आमदार अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या आमदारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.