अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात अखेर जबाबदाऱ्यांचे वाटप, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारांकडे कोणती जबाबदारी?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचे मोठे वाटप करण्यात आले असून सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्याकडे राज्याची महत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.

अजितदादांच्या निधनानंतर पवार कुटुंबात अखेर जबाबदाऱ्यांचे वाटप, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारांकडे कोणती जबाबदारी?
sunetra pawar ajit pawar
| Updated on: Apr 24, 2026 | 11:01 AM

सध्या सर्वच राजकीय पक्षात आगामी निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत. एकीकडे भाजप, शिवसेना शिंदे गट यांनी आगामी २०२९ च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही तयारीला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची पुढील वाटचाल कशी असणार याबद्दलची नवीन माहिती समोर आली आहे. राजकीय वारसा जपण्यासाठी पवार कुटुंबात जबाबदाऱ्यांचे अधिकृत वाटप करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष संघटना आणि प्रशासकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी तीन स्तरीय फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांकडे काय जबाबदारी?

अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी एका विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या खांद्यावर अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यानुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आता पक्षाचा मुख्य चेहरा असतील. केवळ मंत्रालयापुरते मर्यादित न राहता, त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे आणि शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे, हे त्यांच्या दौऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट असेल.

पार्थ पवार जय पवार यांच्याकडे कोणती जबाबदारी?

त्यासोबतच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मुंबई या राज्याच्या राजधानीसह देशाची राजधानी दिल्लीची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी समन्वय साधणे. तसेच मुंबईतील पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर त्यांचा भर असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती आणि पुणे ग्रामीण भागाची संपूर्ण धुरा जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पातळीवरील जनतेशी संपर्क दांडगा ठेवणे आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असं बोललं जात आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहे. कौटुंबिक एकजूट दाखवत पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी या तिन्ही नेत्यांनी कामाला सुरुवात केल्याचे समजते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us