सोमेश्वर कारखान्यात तिरंगी लढत! सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार, पण दोन्ही गटांसमोर ‘या’ बड्या नेत्याचं आव्हान
Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत चुरस वाढली आहे. पवारांच्या दोन्ही गटांसमोर पुरुषोत्तम जगतापांचं आव्हान उभे राहिले आहे.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आणि बंडखोरी केलेल्या विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचे आव्हान आहे. यामुळे आता ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता मोठी रंगत आली आहे. या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून फारकत घेत कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल असा स्वतंत्र पॅनल केला आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांनी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे आता या निवडणुकीमध्ये मोठी चुरस होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना सर्वांनी पाहिला आता पुन्हा एकदा सोमेश्वर कारखान्याच्या निमित्ताने काकी विरुद्ध पुतण्या असा पवारांचा सामना सर्वांना पाहायला मिळणार आहे.
यामध्ये युतीतील भाजपचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी पुरुषोत्तम जगताप यांना सोबत घेत स्वतंत्र पॅनल करून लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. प्रत्येक जण कारखाना आपल्या ताब्यात राहावा, यासाठी आता प्रचाराला लागणार आहे. मात्र या निवडणुकीत कुणाला यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
