
मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्याची परंपरा कायम आहे. यंदा चार पती-पत्नी जोडप्या रिंगणात उतरल्या आहेत, त्यात विशेष म्हणजे आस्तिक म्हात्रे यांना शिवसेना ठाकरे गटाने तर त्यांच्या पत्नी ममता म्हात्रे यांना शिवसेना शिंदे गटाने तिकिट दिलं आहे. शिवसेनेकडून वंदना पाटील आणि विकास पाटील, राजू भोईर दाम्पत्य, तारा घरत आणि मुलगा पवन घरत, तसंच ठाकरे गटाकडून सोमनाथ पवार आणि पूजा पवार जोडपं निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
आस्तिक आणि ममता म्हात्रे
वंदना आणि विकास पाटील
उल्हासनगर महापालिका निवडणुकीतही सगेसोयरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील पती-पत्नी, कुटुंबातील सदस्य मैदानात उतरले आहेत. उल्हासनगर महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीत पुन्हा एकदा नात्यागोत्याचं राजकारण पाहायला मिळतंय. शिवसेना आणि भाजपकडून 4 कुटुंबातील 12 सदस्य निवडणूक लढवत आहेत.
महत्वाचं म्हणजे ही जोडपी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमधली आहेत. भाजपकडून धनंजय बोडारे, त्यांची पत्नी वसुधा बोडारे आणि वहिनी शीतल बोडारे, तसंच शेरी लुंड त्यांचा भाऊ अमर लुंड आणि वहिनी कांचन लुंड यांना तिकिट देण्यात आलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून विजय पाटील, त्यांचा मुलगा युवराज पाटील आणि वहिनी मीनाक्षी पाटील तसंच राजेंद्र सिंग भुल्लर, त्यांची पत्नी चरणजित कौर भुल्लर, मुलगा विक्की भुल्लर असं चार कुटुंबातील 12 जणांना तिकिट देण्यात आलं आहे.