Omya bull Dashkriya : ओम्या गेला म्हणजे माझ्या वडिलांइतकच… शेकडो लोकांनी फोडला हंबरडा, सात थार, 100 दुचाक्या जिंकणाऱ्या बैलाला शेवटचा निरोप

आज ओम्या बैलाचा दशक्रियाविधी पार पडला. त्यानंतर ओम्याचे असंख्य चाहते प्रचंड दुःखी झाले आहेत. त्यांनी दशक्रियाविधीला हजेरी लावली होती. त्यांनी यावेळी ओम्याच्या गाडा मालकाने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नेमकं काय म्हटलं?

Omya bull Dashkriya : ओम्या गेला म्हणजे माझ्या वडिलांइतकच... शेकडो लोकांनी फोडला हंबरडा, सात थार, 100 दुचाक्या जिंकणाऱ्या बैलाला शेवटचा निरोप
Maval King Omya Dashkriya Vidhi
Image Credit source: social media
| Updated on: Sep 04, 2026 | 4:55 PM

रंजीत जाधव, टीव्ही 9 मराठी, मावळ, पुणे : माणूस आणि प्राण्यांमधील नातं किती घट्ट असू शकतं, याची प्रचिती मावळ तालुक्यात आली. पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीचा शहेनशहा आणि लाखो शौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा ‘ओम्या’ आता अनंतात विलीन झाला आहे. आपल्या वेगवान आणि पराक्रमी धावण्याने तब्बल ३ जेसीबी, ७ थार आणि १०० हून अधिक दुचाकी जिंकून देत ओम्याने मावळचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. मात्र, या लाडक्या ‘ओम्या’च्या निधनाने बैलगाडा शौकिनांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ओम्याच्या दशक्रियाविधीनंतर आता गाडा मालकाची भावूक करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

ओम्या हे नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो वेग आणि ताकद. बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरची त्याची दिमाखदार एन्ट्री होत असे. अनेक शर्यती गाजवत ओम्याने आपल्या मालकाला तब्बल ३ जेसीबी, ७ थार गाड्या आणि १०० हून अधिक दुचाकी जिंकून दिल्यात. त्यामुळे ओम्या केवळ एक बैल राहिला नाही, तर मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील एक अविस्मरणीय नाव बनला होता.

दरम्यान, आज ओम्याच्या दशक्रिया विधीला अत्यंत भावूक वातावरण पाहायला मिळालं. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो बैलगाडा मालक आणि शौकीन या लाडक्या शर्यतीच्या शहेनशहाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले.ओम्याच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्यासाठी शेतातच त्याची भव्य समाधी उभारण्यात आली आहे. एवढंच नाही, तर ओम्याचा हुबेहूब पुतळाही साकारण्यात आला आहे. समाधीस्थळी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात ओम्याच्या आठवणी होत्या.

“ओम्याच्या जाण्याचं दुःख माझ्या वडिलांच्या निधनाइतकंच मोठं आहे. मी आयुष्यात जेवढं प्रेम ओम्यावर केलं, तेवढं कदाचित दुसऱ्या कशावरही केलं नाही. ओम्या हा बैल नव्हता, तो आमच्या घरातील एक सदस्य होता. ईश्वराने त्याला सद्गती द्यावी आणि पुढच्या जन्मी तो पुन्हा आमच्याच कुटुंबात जन्माला यावा, हीच प्रार्थना.”

बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर आपल्या वेगाने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकणारा ‘ओम्या’ आज मैदानातून कायमचा दूर गेला… मात्र, त्याने जिंकून दिलेल्या शर्यती आणि मावळच्या मातीत निर्माण केलेल्या आठवणी यापुढेही कायम जिवंत राहणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us