Khalapur Landslide : अमित ठाकरे यांची पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका; म्हणाले, हे आमदार फोडण्यात…
राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं.

जळगाव | 21 जुलै 2023 : रायगडच्या जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतून 34 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. त्यानंतर काल सकाळपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आजही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्तांच्या यादीत नव्हतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत तेच सांगितलं. त्यामुळे सरकारवर टीका होत आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अमित ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिंदे सरकारवर टीका केली. हे आमदार फोडण्यात व्यस्त नस्ते तर दुर्घटना टाळता आली असती, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच शिंदे सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राजसाहेबांनी आधीच सांगितलं होतं
राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शाळवाडी घटनेबाबत सरकारचं लक्ष वेधले होते. अशी घटना घडू शकते, त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. पण सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसतं तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच सरकारने लक्ष द्यायला हवं होतं. इर्शाळवाडीची दुर्घटना दुर्देवी आहे. सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं, असी टीका अमित ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत उत्तर मिळेल
सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्या घडामोडी विरोधात मनसेने जी स्वाक्षरी मोहीम राबवली होती. त्यात मतदार किती संतापला आहे हे तुम्हाला दिसून आलं असेल. मतदार किती संतापला आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत मिळेल, असंही ते म्हणाले.
मृतांचा आकडा 17 वर
दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर गेला आहे. आज शोधकार्य सुरू असताना एक मृतदेह सापडला. सकाळीच इर्शाळवाडीत एनडीआरएफच्या चार टीम दाखल झाल्या आहेत. काल रात्री थांबलेलं रेस्क्यू ऑपरेशन आज सकाळी पुन्हा एकदा सुरू झालं आहे.
