शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

| Updated on: Nov 30, 2022 | 1:43 PM

लोकांच्या मनातील भावना पूर्ण करण्याचे काम सरकारने केलं आहे. काम केलं नाही असं लोक म्हणतात. आम्ही चुकलो. पण आज आम्ही कुठलेही चुकीचे काम केले नाही म्हणून तुम्ही सगळे आमच्याकडे येता.

शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सातारा: देशात हेलिकॉप्टरने शेतात जाऊन शेती करणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली होती. ठाकरे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे, अशी टीका करतानाच शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिवप्रताप दिनानिमित्ताने प्रताप गडावर नेत्रदिपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवप्रेमींना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी हा सवाल केला. ज्यांच्याकडे काही काम नाही ते राजकीय आरोप प्रत्यारोप करत असतात. आम्ही फक्त काम करत राहणार आहोत. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

लोकांच्या मनातील भावना पूर्ण करण्याचे काम सरकारने केलं आहे. काम केलं नाही असं लोक म्हणतात. आम्ही चुकलो. पण आज आम्ही कुठलेही चुकीचे काम केले नाही म्हणून तुम्ही सगळे आमच्याकडे येता. आम्ही बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करणार आहोत. आम्ही भाजपसोबत युती केली. आम्ही काही चुकलो नाही, असंही त्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवरायांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे सगळे प्रसंग पुढे नेणार याची मी साक्ष देतो. अफझल खानाने वार केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी प्रतिवार केला. छत्रपती शिवराय हे आपल्या देशाचा आरमाराचे जनक होते. अनेक जलदुर्ग छत्रपती शिवरायांमुळे उभे राहिले. आज देखील ते थाटात उभे आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. आज 363 वा शिवप्रताप दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भगवा ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं होतं.

शिवप्रताप दिनाला येण्याचं मला निमंत्रण देण्यात आलं, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या निमित्ताने उंच भगवा ध्वज फडकवण्याची संधी मला मिळाली, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

गडकोट किल्ले महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहेत. या किल्ल्यांची बांधणी पाहिली तर आजचं आर्किटेक्चर आणि इंजिनीयरिंग फिकी पडते. हा ठेवा आपलं अॅसेट आहे. सरकार या किल्ल्यांचं संवर्धन करणार आहे. प्रतापगडाचं आम्ही संवर्धन करणार आहोत त्यासाठी 25 कोटी रुपये देण्याचे आदेश पर्यटन मंत्र्याला दिले आहेत. हे पैसे टप्प्प्याने दिले जाणार आहेत, असं त्यांनी जाहीर केलं.

खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला आले नाहीत. त्यावर त्यांनी अधिक प्रतिक्रिया दिली नाही. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने सर्वच आनंदी आहेत, असं म्हणत शिंदे यांनी वेळ मारून नेली.