नवरात्रीआधी मोठी बातमी, तुळजाभवानी देवीच्या सिंहासन पूजा 13 दिवस बंद असणार
तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे. या वेळापत्रकात महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. विशेष म्हणजे मंदिर प्रशासन ऑनलाईन पद्धतीने सिंहासन पूजा स्वीकारली जाणार आहे.

संतोष जाधव, Tv9 मराठी, धाराशिव | 22 सप्टेंबर 2023 : नवरात्रीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे तुम्ही तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. ऑक्टोबर महिन्यात तुळजाभवानी देवीची सिंहासन पूजा 13 दिवस बंद असणार आहे. नवरात्र काळातील निद्रेदिवशी देवीच्या सिंहासन पुजा होणार नाहीत. जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीचे वेळापत्रक मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आलं आहे. तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 6 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होणार आहे. घटस्थापना पूर्वी देवीची मंचकी निद्रा 7 ते 14 ऑक्टोबर आणि दसऱ्यानंतर 24 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सुरु असणार आहे.
सिंहासन पूजा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार
विशेष म्हणजे ऑक्टोबरमधील इतर दिवशी सिंहासन पूजा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. सिंहासन पूजा नोंदणी 26 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 पर्यंत करता येईल. त्यानंतर ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने सोडत काढली जाईल, अशी माहिती मंदीर संस्थानकडून जारी करण्यात आली आहे.
