VIDEO: जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडला, पकडून थेट खोलीत डांबला!

| Updated on: Aug 14, 2021 | 11:58 PM

शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होतात. यात त्यांचा बळीही जातो. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक शेतकरी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO: जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडला, पकडून थेट खोलीत डांबला!
Follow us on

अहमदनगर : शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होतात. यात त्यांचा बळीही जातो. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एक शेतकरी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडल्याचं पाहायला मिळालं. या शेतकऱ्याने केवळ बिबट्याचा सामनाच केला नाही, तर बकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या या बिबट्याला पकडून थेट खोलीत डांबलं.

शेतकऱ्याची ही हिंमत पाहून सध्या जिल्ह्यात शेतकर्‍याचा नादच खुळा अशी चर्चा सुरू आहे. जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बिबट्याला शेळ्यांच्या खोलीत कोंडल्याची ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागात वनकुटे येथे घडली. प्रकाश रेवजी हांडे असं या धाडसी शेतकर्‍याचं नाव आहे.

धडक देत कडी कोयंडा वाकून बिबट्या बकऱ्यांच्या खोलीत

वनकुटे गावा अंतर्गत असलेल्या कळमजाई वस्ती येथे प्रकाश रेवजी हांडे हे राहातात. त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेळ्या आहेत. नेहमी प्रमाणे त्यांनी शुक्रवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी आपली सर्व बकरे एका खोलीत कोंडून बाहेरून दरवाज्याला कुलूप लावले. मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बिबट्या त्या ठिकाणी आला आणि त्याने धडक देत कडी कोयंडा वाकून खोलीत प्रवेश केला.

जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने बिबट्या जेरबंद

आतमधील बकरांवर हल्ला करताच बकरे मोठ मोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे हांडे हे झोपेतून जागे झाले आणि घराच्या बाहेर आले. खोलीच्या दिशेने धाव घेत आतमध्ये जावून पाहिले तर समोर बिबट्या दिसला. आतमध्ये बिबट्याने काही बकरांचा फडशा पाडला होता. हे सर्व पाहून हांडे बाहेर येत असतानाच बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, हांडे यांनी पटकन बाहेर येत जीवाची पर्वा न करता त्याला मोठ्या धाडसाने जेरबंद केले. घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते सिताराम हांडे यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली.

तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

यानंतर वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक सुजाता टेंबरे, दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ, आंथा काळे हे सर्व जण घटनास्थळी पिंजरा घेवून गेले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने काही नागरिकांच्या मदतीने पिंजरा खोली जवळ लावला. जवळपास तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बिबट्यामुळे आम्ही रात्रभर झोपलो नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यात सामाजिक कार्यकर्ते सिताराम हांडे, पोलीस पाटील गुलाबराव पोखरकर, अशोक हांडे, सिताराम पांडुरंग हांडे, महेश हांडे,गणेश हांडे, गुलाब ईनामदार आदी शेतकर्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, जीवाची पर्वा न करता प्रकाश हांडे यांनी बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे हांडे यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Video | हरीण आपल्यातच गुंग, बिबट्या दबा धरून बसला, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहाच !

हडपसर परिसरात नागरी वस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये दहशत

बिबट्याने लेकीचं मुंडकं पकडलं, फरफटत नेलं, पाठलाग करुन आईने वाचवलं, बिबट्याशी लढणाऱ्या आईची शौर्यगाथा

व्हिडीओ पाहा :

Farmer caught leopard while attacking on pate animals in Vankute Sangamner