शेतकऱ्यांना कंपन्यांनी फसवलं! पेरणी करूनही काहीच नाही उगवलं…अकोल्यात दुबार पेरणीचं मोठं संकट… मायबाप सरकार कारवाई करणार का?
Bogus Seeds Farmers: अकोला जिल्ह्यात सोयाबीन, तूर आणि कपाशी पेरलं पण साधा अंकूरही फुटला नाही. बियाणं बोगस असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे. कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Bogus Seeds Farmers: अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा परिसरात सोयाबीन, तूर आणि कपाशी पेरली केली पण साधा अंकूरही फुटला नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. यासाठी कारण ठरलंय पेरलेलं बियाणंचं निकृष्ट दर्जाचे असल्याचं. अनेक भागांमध्ये शेतकर्यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केली. तर पेरणीनंतर 2 आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडं तक्रारी केल्या आहेत. पण या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. तर अनेकांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं होतं. मात्र बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. तर यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे.
विधिमंडळातही गाजला बोगस बियाण्यांचा मुद्दा
बियाणे न उगवल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील गाजलाय. बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करीत विक्री थांबवण्यात यावी, आणि शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजप आमदार हरिष पिंपळे यांनी विधानसभेत केली आहे.
या बियाणे कंपनीची विक्री थांबवा, आमदाराची मागणी
‘अंकुर सीड (चारू तूर)’, ‘न्यूझीलम व मंगलम सीड (कपाशी)’. ‘बूस्टर, इंगो, रवी, ओसवाल, केडियम, ग्रीन गोल्ड, एशियन ऍग्रो, आदित्य, बिंगर, ईगल’ या सर्व सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी आमदार पिंपळे यांनी केली आहे.
कंपन्यांवर कडक कारवाई करा
ज्या बियाण्यांमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले, त्या दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई झालीच पाहिजे. आणि बियाणे न उगवलेल्या शेतांचे तातडीने शासकीय पंचनामे करण्यात यावेत. बाधित शेतकऱ्यांना बियाणे कंपन्या आणि शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सरकार बोगस कंपन्यांवर मकोका लावणार का?
अनेक भागात भिज पाऊस, रिमझिम, दमदार पावसाने हजेरी लावली आहे. शेती मशागतीला आणि पेरणीला वेग आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली आहे. तर बोगस बि-बियाणे, खतांच्या विक्रीचाही धोका वाढला आहे. सरकारने अनेकदा कारवाई करून, सक्त नियम करूनही शेतकऱ्यांची फसवणूक थांबलेली नाही. बोगस बि-बियाणे विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून अर्थपूर्ण डोळे झाक होत असल्याची ओरड नेहमी होते. अशा बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर ‘मकोका’ लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी यापूर्वी विधानसभेत केलेली आहे. मकोका लागला तर अशा कंपन्यांना आणि विक्रेत्यांना चांगला दणका बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.