लॉकडाऊमुळे टेलरिंग दुकान बंद, शेळ्या चारायला गेलेल्या इसमावर बिबट्याचा हल्ला, मृत्यूने गाठलं
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. ही घटना शेडगाव शिवारात घडली असून शेळ्या चारण्यासाठी गेलेले असताना हा हल्ला झाला.

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव येथील इसमाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. ही घटना शेडगाव शिवारात घडली असून शेळ्या चारण्यासाठी गेलेले असताना हा हल्ला झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलीय. (Kotherao Tipale killed leopard Attack Samudrapur Wardha)
लॉकडाऊनमुळे टेलरिंग दुकान बंद, शेळ्या चारण्यासाठी शेतात
कोठेराव रामभाऊ टिपले अस मृताचं नाव आहे. कोठेराव हे टेलरिंगचा व्यवसाय करायचे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने त्यांनी शेळ्या विकत घेऊन, त्यांची गुजराण करुन, शेळ्यांची विक्री करायचा व्यवसाय सुरु केला. शेळ्यांना चारण्यासाठी ते दररोज शेडगाव परिसरात घेऊन जायचे. मंगळवारीसुद्धा ते शेळ्यांना चारण्यासाठी गेले मात्र संध्याकाळी परत आले नाही.
शेळ्यांना चारण्यासाठी गेले, ते घरी परत आलेच नाहीत
वडील आले नसल्याचे पाहत मुलाने फोन लावला मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. मुलाने शोधाशोध केल्यावर शेडगाव शिवारात सय्यद पटेल यांच्या पडीक जमिनीवर वडिलांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडला.
घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत वनविभागाला बोलावले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत तातडीने पाच लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kotherao Tipale killed leopard Attack Samudrapur Wardha)
हे ही वाचा :
घराबाहेर खेळताना बिबट्याचा हल्ला, पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
